नवरसांवरती प्रयोजलेल्या एका एकांकिकेतील एक प्रवेश... रंगमंच पाहू न शकलेला...
पात्र परिचय: १. सामान्य माणूस २. विदूषक
( स्टेजवर पूर्ण काळोख. २ सेकंद. विचित्र शांतता. अचानक आवाज चालू. प्रथम कुजबुज. त्याबरोबर 'माणसा'चा प्रवेश. काहीतरी शोधतोय. सापडत नाही. त्रस्त. अचानक आवाज वाढतात. आवाज...
blackच्या तिकिटांची विक्री... डबेवाल्यांचा आवाज... मोठ्याने हसणे... अचकट विचकट comments...' हमारी मांगे पूरी करो...'...हुज्जत घातल्याचा आवाज... ढोलकीचा आवाज... घंटा आणि झांजा... 'विठ्ठल विठ्ठल'... 'कांटा लगा.."... किंकाळी... मोठे हास्य.....
प्रत्येक वेळी चेह-यावरचे भाव बदलतात. आधी विमनस्क... येरझारा... शेवटी ओरडतो...)
माणूस: बास!! (कोसळतो... हताश होवून बसतो. शून्यात नजर. काहीतरी ठरवून उठणार इतक्यात...)
विदूषक: (विदूषकाचा प्रवेश माणसाच्या किंकाळीच्या वेळी. आवाजाने थबकतो. प्रेक्षकांकडे पाहून 'वेड लागलंय वाटतं'चे हावभाव. टिवल्याबावल्या करत माणसापर्यंत पोहोचतो. तो उठणार इतक्यात...) काय हो, तुम्ही दिवसाही स्वप्नं बघता का हो?
माणूस: (लक्ष देत नाही) चक्.....
विदूषक: अहो, मला तर रात्रीही व्यवस्थित स्वप्नं पडत नाहीत. असं म्हणतात, की जास्त स्वप्नं पडणारा माणूस सर्वात जास्त विचार करतो. आता बघा ना... यावरुन मला माझे सगळे मित्र बिनडोकंच म्हणायला लागले आहेत. एकजात सारे...
माणूस: (त्याच्या बडबडीने हैराण होत 'कुठून ही ब्याद' अशा आविर्भावात...) अहो, तुम्ही कोण... कुठले... हे मधूनच येऊन मला का हैराण करताय?
विदूषक: आत्ता!!!.... अहो अशा या रम्य संध्याकाळी, समुद्राच्या किनारी... एखादं गाणं...(आठवतं)... गाणं... 'सागर किनारे, दिल ये पुकारे, तू जो नही तो मेsss(आवाज चिरकतो... खाकरतो)...म्हणजे आपलं गाणं वगैरे म्हणायचं सोडून तुम्ही हे असे 'बास!' (ओरडतो, माणूस दचकतो) वगैरे आरोळ्या ठोकत होतात... म्हणून म्हटलं...जरा विचारपूस करूया. एखादं चांगलं horror स्वप्न वगैरे बघितलं असेल तर आम्हालाही कळू दे... आजकाल तसेही डझनभर भयपट आले तरी मी काही घाबरू शकलो नाही... म्हणजे त्या गोष्टीतली ती राजकन्या नाही का... काही केल्या हसतंच नसते... आणि मग ती कोंबडी...
माणूस: (त्याच्या या असंबद्ध बडबडीमुळे आणखीनच वैतागत) अहो गप्प बसा हो... आधीच जगातल्या या कोलाहलामुळे त्रस्त झालोय मी... निदान समुद्राच्या पोटात तरी शांतता मिळेल म्हणून इथे आलो तर.... तर इथेही तुम्ही...
विदूषक: म्हणजे... म्हणजे तुम्ही पोटात उडी(चूक लक्षात येते)... आपलं..पोटात पाणी... आपलं..समुद्रात आssत्म...हssत्याss करणार होतात?!!!
(माणूस बघतो. शांतपणे बघून मान खाली घालतो.) अहो पण का?
माणूस: हं, (विषण्णपणे हसतो) आता उरलंय काय या जगण्यात? जीवनातला सगळा रसंच संपून गेलाय माझ्या..
विदूषक: अहो पण मग दुस-यांना त्यासाठी कशाला त्रास देताय? (माणूस प्रश्नार्थक नजरेने पाहतो) म्हणजे बघा, तुम्ही तर बुडून मरणार; पण तुमचं प्रेत तसंच पाण्यावर तरंगणार; मग कुजणार... उगाच समुद्र किती खराब होईल हो त्यामुळे?!! मग बिचा-या माशांना किती त्रास होsss..
माणूस: किती क्रूर बोलताय तुम्ही...
विदूषक: (हसतो) मी..? अहो मी तर् जीवनाचा पुरेपूर आनंद घेतोय आणि तुम्हालाही घ्यायला सांगतोय... अहो तुमच्या जीवनातला रस संपलाय असं तुम्हाला वाटतं ना? मग एकवार इतरांकडे डोळे उघडून बघा... अहो केवढी रसपूर्ण आहे ही दुनिया! (माणूस गोंधळून बघतो) अहो हा सूर्यास्त पहा... ते तेजोमय बिंब सागरात विरताना पहा... एक दिव्यत्वाचा अनुभव नाही येत तुम्हाला यातून? ते स्वच्छंद फिरणारे पक्षी.. या धुंद लाटा... हे निसर्गसौंदर्य मनाला शांतता नाही देत तुमच्या? अहो एखादी नववधू जेव्हा लाजते... तेव्हा ती श्रुंगारिकता मोहवून नाही टाकत तुम्हाला?
माणूस: हं..(कुत्सितपणे) कसलं काय?
विदूषक: अरे... अहो या खून, दरोडे, मारामारी, बलात्कार यांचाच वैताग आलाय ना तुम्हाला... या जगातल्या खोटेपणाचाच त्रास होतोय ना तुम्हाला... अहो पण यातूनही कितीतरी गोष्टी शिकताच की तुम्ही... काय?...( माणसाकडे बघून) नाही शिकत?
माणूस: (चेह-यावरचे भाव बदलतात) ... याचा विचारच कसा केला नाही मी?
विदूषक: मी कशाला आहे मग... म्हणजे... येताय माझ्याबरोबर?
माणूस: कुठे?
विदूषक: मी बाबा कंटाळलोय या अंधाराला... चला जरा फेरफटका मारून येऊया... तुम्हाला माकझ्या दॄष्टीने आता दुनिया दाखवतो...
(सहज माणसाला उठवतो... स्टेजच्या मध्यभागी येतो... प्रकाशयोजनेचा खेळ...)
- Samruddhi
( January 2006)