पाखरू फुलाला रोज भेटायला येई. गाणी गाई. फूल रोज मोहरून जाई. एके दिवशी पाखराने फुलाला विचारलं,"माझ्याबरोबर येतोस? कुंपणापलीकडे खूप मोठी बाग आहे. तिथला आंब्याचा मोहोर तुला दाखवीन. चिवचिवणा-या चिमण्यांशी तुझी ओळख करून देईन. चल माझ्याबरोबर…"
फूल म्हणालं,"मला आवडेल… पण ज्या क्षणी तू मला खुडशील, त्या क्षणापासून तुझं हे लालभडक फूल फक्त कोमेजू लागेल. मी ह्या रोपट्याचा एक भाग आहे, आणि रोपटं माझा. माझ्या पाखरा…. रोपट्याशिवायचं फूल, हे फूल नसतं… असतं फक्त निर्माल्य.…"
पाखरू हसलं. मनोमन उमजलं. आजही फुलाचा सुगंध बागेपर्यंत पोहोचतो. पाखराची गाणी अजूनही कुंपणापलीकडे पोहोचतात. आजकाल त्यातला गोडवा आणीकच वाढलाय. वेदनेचं पाझरणं नेहमीच गोड असतं नाही….?
"जब हुआ जिक्र जमाने में मोहोब्बत का, शकील…
मुझको अपने दिल-ए-नाकाम पे रोना आया…
ए मोहोब्बत, तेरे अंजाम पे रोना आया…"
- Samruddhi