Sunday, July 11, 2021

उपज

 "बाबा, तू ठीक आहेस? चित्रा आत्याचा फोन आला... मैफिलीतून मधूनच उठून गेलास.. हे असं दुसऱ्यांदा घडतंय बाबा... It's about time... झाले आता.. वर्ष होऊन गेलं आता. अजून किती वेळ घेणारेस सावरायला? आणि इतका त्रास होत असेल ना, तर मग गाण्याचे कार्यक्रम नको घेत जाऊस. लोक तुला ऐकायला मुद्दाम प्रवास करून येतात... " शर्वरी थोडी चिडलीच होती. पण तिच्या बोलण्यातली कळकळ अभिला जाणवत नक्की होती. विशाखा गेल्यापासून हा पहिलाच मोठा कार्यक्रम घेतला होता अभिने. नाही म्हणायला एक छोटी मैफल केली होती एका मित्राकडे... पण तेव्हाही गाता गाता अचानक अभिजीतला भरून आलं तिच्या आठवणीने आणि तो चक्क बंदिश अर्धीच सोडून निघून गेला. सगळेच जवळचे, त्यामुळे ह्याचा फार गवगवा झाला नाही. पण त्यानंतर आलेले चारेक कार्यक्रम अभिने असेच सोडून दिले, मानसिक तयारी नाही म्हणून. अखेर परवाचा कार्यक्रम. कुठेतरी सुरुवात करायची म्हणून, आणि चित्राचा आग्रह म्हणून अभिने गायला होकार दिला होता. सुरुवात ठीक झाली. अगदी नेहमीसारखी रंगत नसला तरी रागविस्तार होत होता. दोन राग गाऊन झाल्यावर अभिने ठुमरी गाणार असं म्हंटलं, आणि प्रेक्षकांमधून 'याद पिया कि आए' ची फर्माईश आली. अभिच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. विशाखाचं प्रेम होतं ह्या ठुमरीवर... 

विशाखाचं निदान झालं तेव्हा अभि दौऱ्यावर होता. तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर हे नुसतं ऐकूनच अभि सैरभैर झाला होता. दौरा अर्धवट टाकून तो आला तोच तणतण करत. आपल्या हाताबाहेर काही गोष्टी आहेत ही जाणीवच अभिसाठी त्रासदायक होती. विशाखाचं असणं, तिच्या असण्याचं त्याच्या आयुष्यात असलेलं गृहीतक, ह्या सगळ्याला विशाखाच्या अचानक आलेल्या आजारपणामुळे तडा गेला होता. रियाजाशिवाय आपण एकही दिवस जगू शकत नाही ह्या अभिच्या समजुतीलासुद्धा धक्का बसला होता. निदान झाल्यापासून पुढचे दोन-तीन महिने विशाखाच्या उपचारांमध्ये, अभि स्वतःचं गाणं थोडं विसरूनच गेला होता. नाही म्हणायला शरू-शंभू मदतीला होत्या, पण त्यादेखील त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळून. शाम्भवीच्या परीक्षा, तिचा अभ्यास, आणि शर्वरीचा संसार ह्यात विशाखाच्या आजारपणासाठी वेळ देणं दोघींनाही कठीण जात होतं... आणि खरं तर विशाखालाच ते मान्य नव्हतं. मग पुढच्या काही महिन्यात कीमो-रेडिएशन ह्या सगळ्यात विशाखा हळूहळू कोमेजत गेली, आणि कॅन्सर मात्र वाढत गेला. 

विशाखाला मृत्यूची जाणीव झाली होती. शेवटच्या काही दिवसांमध्ये ती बराच काळ लॅपटॉपवर घालवत होती. तिने अभिला रियाझ पुन्हा सुरु करायला भाग पाडलं होतं. तिच्या आवडत्या बंदिशी, राग, नवीन रचना, ठुमरी... अभिकडून म्हणवून घेऊन ती जणू साठवून घेत होती. बरंच काही इतरही ऐकत होती, लिहीत होती. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या तिच्या सगळ्या कथा-कविता शम्भूकडून तिने मुद्दाम मागून वाचल्या होत्या. कित्येक वर्षांनंतर विशाखा पूर्णतः आत्मकेंद्रित झाली होती, आणि ह्याचं सगळ्यांनाच खूप अप्रूप वाटत होतं. अभिला काहीच सुचत नव्हतं, आणि विशाखा दिवसेंदिवस शांत होत होती. शांततेतच ती निघून गेली आणि अभि कोलमडून गेला. 

'याद पिया कि आये' ची फर्माईश आली, आणि ह्या सगळ्या आठवणी अंगावर धावून आल्या. अभिने स्वतःला सावरलं, आणि गायला सुरुवात केली. पण त्याचा घसा दाटून आला.. आवाज लागेनासा झाला.. आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला फक्त शब्द दिसले... त्याभोवतीचं संगीत मात्र कुठेतरी हरवून गेल्यासारखं झालं. आतापर्यंत इतकी रंगणारी ठुमरी आज त्याला गाताच येत नव्हती. काही म्हणजे काही सुचतच नव्हतं... वेड्यासारखा... अभि स्वरमंडळ खाली ठेवून श्रोत्यांना नमस्कार करून निघून गेला. शाम्भवीने पुढे काय केलं; श्रोत्यांना, आयोजकांना कसं समजावलं; कसलीच अभिला शुद्ध राहिली नव्हती. 

"बाबा, कोणीतरी नचिकेत म्हणून भेटायला आलेयत तुला. आईसंबंधी काहीतरी आहे म्हणाले. काय सांगू?" शाम्भवीने अभिची तंद्री मोडली. 'भेटतो' असं म्हणून अभि दरवाजाशी आला. त्याच्याच वयाचा, चेहऱ्याने ओळखीचा एक माणूस दरवाज्यात उभा होता. पाठीवरच्या बॅगकडे आणि त्याच्या दमलेल्या चेहऱ्याकडे बघून हा नचिकेत बराच लांबचा प्रवास करून आला होता, हे सहजंच कळत होतं. अभि दिसल्याबरोबर नचिकेतने हात जोडून नमस्कार केला. त्याच्या हसण्यात का कोण जाणे, अभिला विशाखाचाच भास झाला. "तू मला फारसा ओळखत नाहीस.. पण मला तू बराच माहित आहेस. माफ कर, तुम्ही ना म्हणता तू म्हंटलं तुला. पण आपण साधारण एकाच वयाचे आहोत, आणि तुला ओळखणारी सगळी मंडळी तुला अरे तुरे करतात, म्हणून..." नचिकेतच्या ह्या अशा बोलण्याने अभिच्या चेहऱ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. "आत या... ये. शंभू, जरा चहा वगैरे बघतेस?" नचिकेत येऊन बसला, शाम्भवीने आणलेला चहा घेऊन झाला, तरीही अभिच्या चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह कायम होतं. अखेर नचिकेतनेच बोलायला सुरुवात केली आणि हळूहळू अभिला बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. 

"जवळजवळ दीड वर्षांपूर्वी मला विशाखाची ई-मेल आली. तशा आमच्या इमेल्स नेहमीच असायच्या, फोन वरून सुद्धा संपर्क होताच. पण ह्या ई-मेल चं कारण तिचं नव्याने झालेलं निदान होतं. तिला कॅन्सर झाला होता आणि आपण ह्यात जाणार हि तिची खात्रीसुद्धा झाली होती. तू दौऱ्यावर होतास आणि तिला तिच्या जवळच्या माणसाची खूप गरज होती. तुझ्या गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये ही बातमी तुला दिली तर तू बेचैन होशील, तुझं लक्ष लागणार नाही, आणि आयोजकांना त्रास होईल... अशा विचारानं तिने तुला हि बातमी सांगायला टाळाटाळ केली. शेवटी माझ्या आग्रहाखातर म्हण, किंवा माझ्या धाकाने म्हण... विशाखाने शरुला कळवलं, आणि तिने तुला."

अभिला हे नक्की काय ऐकतोय हेच कळत नव्हतं. आजतागायत कधीही न भेटलेला हा मनुष्य घरातल्या सगळ्यांबाबत इतक्या सहजतेने बोलत होता कि जणू तो कुटुंबाचाच भाग असावा. अभिच्या मनातल्या ह्या शंकांची जाणीव नचिकेतला झाली असावी. 

"तुला सगळं सांगायचं हे ठरवूनच आलोय. तू गोंधळून गेला आहेस. साहजिक आहे. मी कोण हे सांगण्याआधीच मी विशाखापर्यंत पोचलो बघ. माझी आणि विशाखाची ओळख तुझ्याच एका कार्यक्रमात झाली. ती तुझी बायको आहे हे कळण्यापूर्वीच तुझ्या गाण्यावर मी ताशेरे मारले होते. 'हा गायक ताकदीचा आहे पण थोडी उपज कमी पडतेय...' असं मी म्हंटलं, आणि त्यावर 'उपज ह्या शब्दाचा तुम्हाला उमगलेला अर्थ नक्की काय हो' हा प्रश्न मला तिने विचारला. मग गाणं उमजणे, समजणं, सादरीकरण, अशा सगळ्या तांत्रिक गोष्टींबद्दल आमच्या गप्पा सुरु झाल्या. तुझं गाणं, त्यातले बारकावे, त्यातली चमत्कृती मला समजावून सांगण्यात मग पुढचा सगळा वेळ आम्ही घालवला. कार्यक्रम संपल्यावर मी तिचा संपर्क घेतला आणि तेवढ्यात तुझी बायको अशी तिची ओळख सुद्धा कळली. तिच्याबद्दल कुतूहल गप्पांमध्ये निर्माण झालं होतंच. ही नवीन ओळख कळल्यावर आदरही वाढला. मग कधी तुझ्या नवीन येणाऱ्या रेकॉर्डिंग्स च्या निमित्ताने, तर कधी असंच गाण्याबद्दल अशा आमच्या गप्पा सुरु झाल्या. हळूहळू गप्पांचे विषय रुंदावत गेले, चर्चा वाढत गेल्या. प्रत्यक्ष फार कधी भेटलो नसलो तरी फोन, पत्रं, नंतर मेसेज, इमेल्स ह्यातून सहवास सतत होताच. जवळीक ही अशीच वाढत गेली..."

"माझाही संसार होताच. कामामुळे माझं अधूनमधून बोलणं कमी झालं कि तिच्याकडूनच एक झणझणीत पत्र यायचं. आवडायचं. मग पुन्हा विशाखाची बाळंतपणं, त्यानंतर तिला झालेले त्रास... ह्या सगळ्या बाबतींत मी म्हणजे तिचं मोकळं होण्यासाठीचं एक हक्काचं माणूस होऊन गेलो. तिने लेखनाला सुरुवात केली तेव्हा पहिले ड्राफ्ट्स मला ई-मेल मधून मिळायचे. सुरुवातीला भावनिक असणारं तिचं लिखाण परिपक्व होताना मी पाहिलंय. आमच्यातलं नातं देखील तसंच परिपक्व होत गेलं. आम्हा दोघांना एकमेकांची सवय झाली होती. काही हळव्या क्षणी तिचं असणं हे प्रत्यक्षात मिळावं अशी मागणी सुद्धा केली मी तिच्याकडे... पण... असो. कॅन्सरच्या निदानानंतर तिच्या इमेल्स वाढल्या. रोज २-३, कधी कधी ५ सुद्धा. भडाभडा बोलून टाकल्यासारखी लिहीत होती. तुझ्याबद्दलची काळजी, प्रेम, तगमग...  तुम्हा दोघांच्या जुन्या आठवणी... ह्या सगळ्याबद्दल चाललेलं तिचं चिंतन असायचं त्या सगळ्यांत. मग एक ई-मेल आली, तब्ब्येत खूप खालावलीय, अजून किती लिहीन माहीत नाही. अभिजीतला भेटून जा... बोलून जा."

नचिकेतला दाटून आलं होतं. स्वतःला सावरण्यासाठी त्याने पाण्याचा घोट घेतला. 

अभिच्या मनात मात्र प्रश्नांची गर्दी झाली होती. त्याला थोडा धक्का देखील बसला होता. विशाखाच्या... त्याच्या विशाखाच्या आयुष्यात अशी कोणी इतकी जवळची व्यक्ती असावी आणि त्याची अभिला कल्पनासुद्धा नसावी हा विचार त्याला झेपत नव्हता. त्यांच्या संसारात अभिला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नव्हती. विशाखाने त्याच्या गायनात, त्याच्या आयुष्यात कायम साथ दिली होती. मुलींसाठी सुद्धा आई कायम सोबत होती. मग हे असं सगळं असताना विशाखाच्या आयुष्यात नचिकेतचं असणं हे कोणालाही जाणवू सुद्धा नये... एका प्रकारे विशाखाने आपली यशस्वीरीत्या फसवणूक केली अशी काहीशी भावना अभिच्या मनात आली. बहुधा ह्याचीसुद्धा जाणीव नचिकेतला झाली की काय कोणास ठाऊक, पण तोच म्हणाला,

"विशाखा तुझ्याशी खोटं बोलली, तुला फसवलं असा विचार खरंच करू नकोस अभिजीत. तुम्हा दोघांच्या नात्याबद्दल बोलण्याचा अधिकार मला नाही... तिने कधीच दिला नाही. पण मला कायम वाटत आलं कि तिने एक बायको, एका प्रसिद्ध गायकाची पत्नी, त्याच्या मुलींची आई ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडल्या. पण त्याच वेळी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून असलेली तिची स्वतःबद्दलची जबाबदारी सुद्धा तिला पार पाडणं गरजेचं होतं. तू स्वयंभू होतास, पण तुला जपण्याच्या नादात स्वतःचं मोडकळीला येणं तिला थांबवायचं होतं. अशाच कुठल्या तरी क्षणी मी तिला सापडलो, आणि मलाही मी गवसलो, असं समज. तिची शेवटची ई-मेल मिळाल्यानंतर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तिला शेवटचं भेटायला मिळावं म्हणून निघणार होतो. पण दुसऱ्याच दिवशी बातमी कळली ती गेल्याची. मी थांबलो. तसंही 'तुला' भेटायला तिने सांगितलं होतं. मग इतक्यातच कळलं तुझ्या मैफिलीतून उठून जाण्याबद्दल. वाटलं काहीतरी असंच... म्हणून अखेर जे मिळेल त्या विमानाने आलो इथे. खरं तर तुला भेटलोच नसतो, तुला हे काही कधी कळलंच नसतं, तरीही चाललंच असतं. पण मला अगदी पहिल्या भेटीत विशाखा म्हणाली होती तसं... एखाद्या रागाचे आरोह-अवरोह, एखादी बंदिश, चलन हे शिकलं ना, कि राग समजू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी घोटल्या, पुन्हा पुन्हा रियाझ केला, कि त्या रागाची खोली कळायला लागते, आणि तो राग उमजतो. त्याही पुढे जाऊन त्या रागाचा सर्वांगाने विचार केला, तो खूप ऐकला, त्याला स्वतःच्या जाणिवांची जोड दिली कि अनाहूतपणे जे हाती येतं... ती उपज. विशाखाच्या बाबतीतलं तुझं उपज अंग चांगलं व्हावं म्हणून आलो... असं म्हणूया हवं तर."

अभिचं डोकं जड झालं होतं. विचारांचा कल्लोळ उडाला होता मनात. थिजल्यासारखा अभि सोफ्यावर बसून राहिला. नचिकेतला पुढे काय उत्तर द्यावं, सभ्यपणे पाहुणचार करावा, धक्के मारून बाहेर घालवून द्यावं, उत्तरं जाणून घ्यावीत, कि जाब विचारावा... काही म्हणजे काहीही अभिला कळत नव्हतं. शाम्भवी काहीतरी खायला घेऊन आली. पुढचा अर्धा तास नचिकेत शाम्भवीशी बोलला, विचारपूस केली आणि निघूनही गेला. अभि मात्र कुठेतरी हरवल्यासारखाच होता. 

त्या रात्री अभि खूप बेचैन झाला. विशाखाचं नसलेपण अंगी पडणं सोडाच, पण तिचं असणंसुद्धा आपण पूर्ण कधी अनुभवूच शकलो नाही ह्या भावनेने त्याला घेरून टाकलं होतं. आपण कुठे कमी पडलो का, आपण स्वार्थीपणा केला का, तिला दुसऱ्या कोणाची तरी जवळीक वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली... का झाली... त्यात दोष कोणाचा? किंबहुना... दोष असावा तरी का? की फक्त स्वभाव आणि भावना? आपल्याला सोबत देणारी विशाखा आणि नचिकेतकडे मोकळी होणारी विशाखा... नक्की कोणती विशाखा आपल्याला समजली? आणि कोणती निसटली? एकच राग दोन वेगवेगळ्या व्यक्ती गातात ना, तेव्हादेखील त्या रागाची वेगळी अंगं दिसतात. व्यक्तीच्या स्वभावानुसार, त्याच्या प्रकृतीनुसार, रागाचं स्वरूप बदलतं. म्हणजे पहिल्या व्यक्तीला उमजलेला राग योग्य आणि दुसऱ्याला उमगलेला चूक, असं नसतंच ना! आयुष्य संपून जातं, पण राग पूर्ण सिद्ध झाला... असं फार क्वचितच होतं. 

पहाटे शाम्भवीला तंबोऱ्याच्या स्वरांनीच जाग आली. पहाटेच्या रागाच्या आलापीऐवजी वेगळेच सूर ऐकू आले. रागांच्या वेळा रियाजाच्या वेळी सुद्धा पाळणारा अभि भिन्न षड्जाचे सूर लावत होता बहुतेक. पलंगावर बसून अभिने सहज 'याद पिया कि आये' ची सुरुवात केली. पुढची २०-२५ मिनिटं अभि भान हरपून गात होता. शाम्भवी थक्क होऊन ऐकत होती. ठुमरीची उपज अभिला आज खरी जमली होती.    

- समृद्धी 


Picture Credits: अमित उपाध्ये आणि सोनाली हर्डीकर