Sunday, February 23, 2014

पिल्लू

आम्ही तर चक्क ठरवूनच टाकलं होतं आता. मुळळी म्हणजे मुळळीच घरी जायचं नाही. इतका राग आला होता आईचा... सारखं आपलं... 'हे इथे ठेवू नकोस... ते इथे पसरू नकोस... हाताला मुळी वळणच नाही अन डोक्यात मुळी प्रकाशच पडत नाही. रोज एक हजार दोनशे तीस वेळेला नुसती आपली बोलणी ऐकून घ्यायची. आमची किंमतच नाही मुळी कुणाला. परवा काय... बघ... तुझ्यामुळे माझं दूध उतू गेलं.... रोज दूध पिते मी... ते दूध येतं दादू गवळ्याकडून... आणि तेच दूध खरं तर देते त्याच्या गोठ्यातली शिंगी. आणि ते दूध उतू गेलं तर ही चक्क म्हणते... माझं दूध उतू गेलं... वर परत रात्री बाबांकडे तक्रार... "आज सायीचं दही नाही लावलं... हिच्यामुळे दूध उतू गेलं ना..." तेव्हा तर गणूच्या देवळासमोरच्या एकशे तेहेत्तीस वर्षांच्या वडाच्या झाडाएवढा राग आला होता मला. आणि मग बाबासुद्धा... "किती धसमुसळी ग तू..." एका  छोट्याशा चूकीवरून पाचशे त्र्याहात्तर वेळा ऐकून घ्यायचं. आमची काही किंमतच नाही मुळी कुणाला. तिमाही परिक्षेत गणितात पैकीच्या पैकी मार्कं मिळाले त्याचं काहीच नाही, आणि त्या इतिहासात चार इंची वर्तुळ मिळालं म्हणून केवढी शिक्षा... एकोणीस x पंधरा x बारा वेळा सगळ्या सनावळ्या लिहून काढायला सांगितल्या. हात आणि डोकं दोन्ही दुखून आले. डोळे तर अण्णांच्या अंगणातल्या लिंबांएवढे सुजून आले. आता शिवाजीमहाराज केव्हा जन्मले हे आम्ही कशाला आठवू? त्यापेक्षा शितूच्या मनीला करड्या कधी झाला, किंवा दादूची शिंगी किती साली जन्मली हे जर पेपरात विचारलं, तर आम्हाला इतिहासात पैकीच्या पैकी मिळतील. पण आमची मुळी किंमतच नाही कुणाला.
म्हणूनच आज मी ठरवलं.... विहिरीच्या मागच्या जांभळाच्या चौदाव्या फांदीवर चढून बसायचं. तिथेच रात्र काढायची. भूक लागली तर जांभळं आहेत, आणि तहान लागली तर विहीर आहेच. तसं इथे कोणी फिरकत नाही. फक्‍त अण्णांचा धोका आहे थोडाफार. कधी कधी शि-याला संध्याकाळचे फिरवायला येतात. आणि त्याने मला हेरलं की तो भुंकलाच समजा... आम्ही नुसते कुंपणावरून जरी गेलो, तरी याला वाटतं...  आम्ही त्याची लिंबंच चोरायला आलोय. अण्णांना त्याचं भारी कौतुक... तसं अण्णांना माझंही आहेच कौतुक... कधी देवळाजवळ भेटले तर मला गाणं म्हणायला सांगतात आणि मग चक्क छानसं Chocolate देतात. आई म्हणते त्यांची नातवंडांची हौस माझ्यावर भागवतात. म्हनजे काय ते मला कळंत नाही... पण आम्हाला Chocolate मिळतं ते फक्‍त त्यांच्याकडूनच.  आमच्या आत्तापर्यंतच्या सव्वाआठ वर्षांच्या आयु्ष्यात फक्‍त तीन वेळा Chocolate दिलंय आईबाबांनी मला. पण अण्णा चांगले आहेत... म्हणूनच मी ठरवलं, आलेच तर त्यांना चक्क सांगून टाकायचं, मी घर सोडलंय म्हणून. तेच काहीतरी तो 'सामोपचार' का काहीतरी म्हणतात ना, तसा मार्गं सुचवतील किंवा ते इतिहासातले लोक करायचे ना तशा वाटाघाटी करतील... म्हणजे जर मी परत जायचं ठरवलंच तर...
तर विहिरीपाशी आले तेव्हा डुंबायची खूप इछा झाली... पण कपडेच नव्हते बरोबर. शिवाय अंधार पडायच्या आत चढायला पाहिजे होतं. पण जांभळाजवळ जातेच तो एक बाया जोरात आरडाओरडा करत अंगावरच  आला... मी एवढी दचकले... थोडी पुढे जाते तर दुसरा बाया पक्षी अंगावर आला आणि चक्क माझ्या वेणीला चोच मारून गेला. मग बघते तर काय... दोघेही नुसते जांभळाभोवती घिरट्या घालत होते... मला तर त्यांच्या घिरट्या म्हणजे चक्रव्यूहच वाटला... आणि मी अभिमन्यू... आत जाण्यास सज्ज... मी दोनतीनदा दगड घेतले तर त्यांचा कलकलाट आणिकच वाढला, एकदा तर दोघे माझ्या अंगावरच आले.... त्या बायांच्या सातशे वीस घिरट्या झाल्यानंतर दुरून अण्णा येताना दिसले. एकटेच होते पण तरीही... मी थोडीशी घाबरले. नक्की काय करतील माहीत नाही ना... पण ठरवल्यासारखंच करायचं असं ठरवलं.
"अगं, तू आत्ताची इथे कशी?"
"अण्णा, मला आईबाबांचा राग आलाय, त्यांनी मला इतिहासाच्या पेपरवरून खूप शिक्षा दिली आणि ओरडले  म्हणून मी चिडून घर सोडून इथे राहणार आहे." मी एका दमात सांगून मोकळी झाले.
"बंsssरं.... इथे कुठे राहणार?"
"या जांभळीवर, पण हे बाया आज वेड्यासारखेच करतायत... जवळच जाऊ देत नाहीयेत... सारखे चोची मारतायत..."
"खरंच की काय? चल बघू..." असं म्हणत अण्णा त्यांच्याकडचा पंचा गोल फिरवत मला जांभळीजवळ घेऊन गेले. पंचामुळे बाया त्यांच्याजवळ आले नाहित पण कोकलायला लागले... अगदी आमच्या वर्गापेक्षा मो्ठ्ठ्या आवाजात...
"हे बघितलंस? अगं त्यांचं पिल्लू खाली पडलंय... हे बघ..."
"हो की..." खरंच... जांभळीच्या बुंध्यापाशी, विहिरीपासून पंधरा पावलं दूर एक छोटंसं पिल्लू बसलं होतं... ते इतकं घाबरलं होतं की एका मिनिटात नऊशे छप्पन्न वेळा श्वास घेत होतं.
"अगं त्यांचं पिल्लू खाली पडलंय ना म्हणून ते घिरट्या घालतायत. तू जवळ जायला लागलीस आणि त्यांना वाटलं तू त्यांच्या पिल्लालाच काही जखम करशील..."
"पण... मी... नाही... कुठे?... पण मग आता?"
"हे पिल्लू काही दिवसातच चालायला लागेल... तोपर्यंत हे आईबाबा पक्षी त्याला अन्नपाणी पुरवतील आणि  त्याचं संरक्षण करतील. एकदा का त्याच्या पंखात बळ आलं की ते पिल्लू स्वत:हूनच आकाशात झेप घेईल."
"पण हे पिल्लू पडलं कसं?"
"अगं त्याचंही तु्झ्यासारखंच झालं बघ... आईबाबांशी त्या पिलाचं भांडण झालं आणि ते निघालं घरटं सोडून... पण त्याला पंख कुठे फुटले होते अजून? पडलं की खाली ते... असो... तुला काही ह्या जांभळीवर जाता यायचं नाही आज. तू घर सोडलं असलंस, तरी शि-या माझी घरी वाट बघत असेल.  त्यामुळे मी पळतो. तू पाहिजे तर त्या पलीकडच्या पिंपळावरती चढ."
अण्णा निघून गेले. ते अजूनही माझ्याशी चार वर्षांची असल्यासारखेच बोलतात. पिल्लाचं कधी भांडण होतं का? मला नक्की वाटतंय... त्या दुपारच्या वा-यात  त्यांचं  पिल्लू  घरट्यातून खाली पडलं असणार. मी मात्र जांभळीला मुकणार.... मी मागे वळून बघितलं तोपर्यंत अण्णा दिसेनासे झाले होते. अंधार पडायला लागला होता. जांभूळ, पिंपळ... सगळी झाडं आता सारखीच दि्सायला लागली होती. पोटात भुकेनं बायांपेक्षाही कर्कश आवाजात पक्षी ओरडत होते. आईच्या गरम वरणभाताचा वास यायला लागला होता. बाबांच्या गोष्टींच्या पुस्तकांची आठवण येत होती.  शितूला भुताच्या गोष्टी भारी आवडतात.  माझा भुतावर विश्वास नाही...पण अंधारात पलीकडच्या पिंपळावरचा एखादा मुंजा खरोखरच येईल की काय अशी भिती वाटायला लागली. भिती वाटली की रामरक्षा म्हणावी असं आई म्हणते म्हणून मी रामरक्षा सुरू केली... तर  "रामरक्षास्तोत्रमंत्र्यस्य" यानंतरच्या त्या ऋषींचं नावच आठवेनासं झालं... आता श्रीरामचंद्रसुद्धा मी  आई्बाबांशी भांडण केल्याने रागावलेत की काय असं वाटलं आणि मी गच्च गच्च डोळे मिटून घेतले....
आणि दुरून भुंकण्याचा आवाज आला. शि-या.... अण्णा आले.... मी विहिरीच्या कडेनं बघितलं तर आईला घेऊन बाबा आणि शि-याला घेऊन अण्णा येत होते. मी चक्क धावत जाऊन आईला गच्च गच्च मिठी मारली. डोळ्यांच्या आत असलेलं पाणी ताशी पंचवीस लिटर वेगाने वाहू लागलं. अण्णांनी बाबांना सगळं सांगितलं होतं... आता पुन्हा ओरडा म्हणून मी घाबरत बाबांकडे बघितलं तशी बाबा म्हणाले... "पुढच्या वेळी घर सोडशील, तेव्हा वरणभात आणि गोष्टीची पुस्तकं कुठे आणून देऊ ते सांग."
माझ्या डोळ्यातल्या पाण्यात आता आईच्या डोळ्यातलं पाणी आणि बाबांचं गडगडाटी हास्य मिसळलं.

- समृद्धी

(प्रकाश नारायण संत ह्यांच्या लेखनशैलीने प्रेरीत.)




No comments:

Post a Comment