Sunday, February 27, 2022

उंच उंच झुला

"First the worksheet, then swing." सॅरा म्हणाली. कधीही काहीही करायचं असलं, करवून घ्यायचं असलं माझ्याकडून की नेहमी मला हेच सांगितलं जातं. आधी होमवर्क, मग स्विंग; first clean up, then swing; आधी 'finish the food', मग स्विंग. मला आवडतो झोपाळा. खूप. विनीकडे तर खूप खूप झोपाळे आहेत. चौकोनी झोपाळा, रिंग सारखा झोपाळा, झोळीसारखा झोपाळा... झुला. झोपाळ्यावर बसलं, की सगळ्या गोष्टी कशा नीट समजायला लागतात. जमिनीवरचे पाय उचलले की मी मोकळी होते. झोपाळा वर वर जायला लागला, आणि मान अशी सोडून दिली, की डोकं वाऱ्याबरोबर वाहायला लागतं. कानात वारा भरतो, आणि आजूबाजूचे सगळे सगळे आवाज, सगळा गोंगाट बंद होतो. सगळं कसं शांत शांत... आणि मग डोळे मिटून घेतले की... माझे रंग नाचायला लागतात. पिवळा दोन, निळा चार. मला आवडतात. खूप. मला झोपाळा आवडतो. खूप. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तिला सांभाळणं थोडं कठीण व्हायला लागलंय. लहान होती तेव्हा तिची सततची हालचाल, पळापळ मला झेपायची. तिच्या मागे तिच्या वेगाने धावणं, तिला न आवडणाऱ्या गोष्टी तिच्याकडून करून घेणं... जमायचं. ती रडारड करायची, हातपाय झटकायची, कधीकधी डोकंसुद्धा आपटायची... त्रास व्हायचा खूप. मग Occupational Therapy सुरु झालं, तेव्हा लक्षात आलं, तिला झोपाळा खूप आवडतो. विनीने तिला झोपाळ्यावर बसवलं, आणि ती एकदम शांतच झाली. झटापट थांबली, हातपाय झाडणं थांबलं, आणि पहिल्यांदा तिने विनीच्या डोळ्यात बघितलं. झोपाळा थांबल्यावर दुसऱ्या क्षणी माझं बाळ 'more' म्हणालं. त्या क्षणापासून तिचं झोपाळ्यावरचं प्रेम फक्त वाढतंच गेलं. मग एखादी गोष्ट तिच्याकडून करवून घेण्यासाठी झोपाळ्याचं आमिष दाखवणं, नेहमीचं झालं. लहान होती तोवर झोपाळे सहज उपलब्ध होते. तिच्याबरोबर तिच्या वयाची खेळणारी मुलं सुद्धा होती. पण आता... आता नाही शक्य होत. तिचं वय वाढलंय, शरीर पक्व व्हायला नाही म्हणलं तरी सुरुवात होईल... झालीय. आता जबाबदाऱ्या वाढल्यात. माझ्या... आणि खरं तर तिच्याही. आजकाल कोणतीही गोष्ट विचारली कि आधी उत्तर नाही हेच येतं. मग त्यावर चिडचिड, तिची तडफड, माझी तगमग... तिला नक्की काय हवंय, आणि ते कसं हवंय, हे माझ्याच लक्षात येत नाही अनेकदा. त्रास होतो. कठीण होतं.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जेवण झाल्यावर आईने सगळी भांडी डिशवॉशर मध्ये लाव असं सांगितलं. मी करते नेहमी ते काम. पण आज जेवणात कांदा होता. आईला वाटलं मला कळलं नाही कारण मी भाजी खाल्ली. पण मला कळलं. कांदा वाटून घातला आणि भाजी मला आवडणारी असली की मला कांदा आहे हे कळणार नाही असं अजूनही तिला वाटतं. दमते ती बिचारी. पण एखादा उंदीर मरून पडल्यावर किंवा सडलेल्या अंड्यांच्या वासाचा तिला जेवढा त्रास होतो ना, तेवढाच त्रास आणि तेवढाच वास मला येतो कांद्याचा. आता मी मोठी झालीय, म्हणून मी जेवण होईपर्यंत केलं सहन. भाजी खाल्ली थोडी. पण आता माझं डोकं दुखायला लागलंय. असं वाटतंय की हि सगळी भांडी फेकून द्यावीत दूर कुठेतरी. वेगाने पळत जावं लांब लांब आणि झोकून द्यावं दरीत एखाद्या स्वतःला. मग पुन्हा नाकातोंडात वारं भरेल, सगळे वास, सगळे आवाज बंद होतील आणि... मग मी शांत होईन. पण मला चांगलं वागायचंय... म्हणजे खरं तर... त्यांच्यासारखं वागायचंय. नाही सहन होत हा गोंगाट सगळा... वासांचा, आवाजांचा. पण मला शांत राहायचंय... पण नाही... पण... हो...

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुणी आहे ती तशी. गेल्या काही महिन्यात शाळा सांभाळून घरातली बरीच कामं करायला लागलीय. शाळा, थेरपी, होम थेरपी, आम्ही या सगळ्यातून वेळच मिळत नाही तिला कधी. शांत होण्यासाठी, शांत झोपण्यासाठी, खळखळून हसण्यासाठी. विनीच्या सेशन मध्ये त्या एका झुल्यावर तशी खळखळून हसायची. तेव्हा असं वाटायचं तिला सगळं जगच त्या झोपाळ्यावर देता आलं असतं मला, तर किती छान झालं असतं... आकार, रंग, अक्षरओळख, वाचणं, बोलणं... सगळं त्या झोपाळ्याच्या साहाय्यानेच झालं तिचं. पण इतर वेळी मात्र, कुठल्यातरी छोट्याशा वासाने, कुठल्यातरी घटनेने, आवाजाने, तिचं सगळं सगळं बिनसून जायचं. पण आता जशीजशी मोठी होतेय तसं बहुतेक तिला कळायला लागलंय. ती अचानक उठून आपल्या खोलीत निघून जाते कधीकधी, अगदी एखाद्या संभाषणाच्या मध्यावर सुद्धा, पण तिच्या त्रासाचा मला, आम्हाला त्रास होणार नाही, याची कुठेतरी तिला जाणीव व्हायला लागलीय असं मलाच जाणवयला लागलंय. आजदेखील भाजीत कांदा असूनसुद्धा तिने जेवण पूर्ण केलं! आमच्याबरोबर! हात धुताना बाथरूम मध्ये नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ होती खरी, पण आरडाओरडा नाही की खोलीत बंद करून घेणं नाही. तिला 'तुला त्रास होत नाहीये ना' असं विचारल्यावर 'नाही' म्हणाली. पण मला तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात तिचं खरं उत्तर दिसलं. 

पुढच्या आठवड्यात मोठी ट्रिप करणार आहोत, बालीला. मैत्रिणीने पाठवलेल्या तिथल्या एका व्हिडिओ मध्ये एक मोठा झोपाळा बघितलाय मी. एका दरीच्या अगदी शेजारी किंवा काठावरच आहे जणू. त्या झोपाळ्यावर हिला बसलेलं बघायचंय मला. तो झोका उंच उंच गेला की मग हिच्या कानांत वारा भरेल, डोळे मिटून ही खळखळून हसेल, सगळ्या जगाचा हिला विसर पडेल. आणि ह्या वेळी माझ्या डोळ्यात बघून माझं बाळ म्हणेल, 'more'.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-समृद्धी 

1 comment: