Sunday, February 27, 2022

उंच उंच झुला

"First the worksheet, then swing." सॅरा म्हणाली. कधीही काहीही करायचं असलं, करवून घ्यायचं असलं माझ्याकडून की नेहमी मला हेच सांगितलं जातं. आधी होमवर्क, मग स्विंग; first clean up, then swing; आधी 'finish the food', मग स्विंग. मला आवडतो झोपाळा. खूप. विनीकडे तर खूप खूप झोपाळे आहेत. चौकोनी झोपाळा, रिंग सारखा झोपाळा, झोळीसारखा झोपाळा... झुला. झोपाळ्यावर बसलं, की सगळ्या गोष्टी कशा नीट समजायला लागतात. जमिनीवरचे पाय उचलले की मी मोकळी होते. झोपाळा वर वर जायला लागला, आणि मान अशी सोडून दिली, की डोकं वाऱ्याबरोबर वाहायला लागतं. कानात वारा भरतो, आणि आजूबाजूचे सगळे सगळे आवाज, सगळा गोंगाट बंद होतो. सगळं कसं शांत शांत... आणि मग डोळे मिटून घेतले की... माझे रंग नाचायला लागतात. पिवळा दोन, निळा चार. मला आवडतात. खूप. मला झोपाळा आवडतो. खूप. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तिला सांभाळणं थोडं कठीण व्हायला लागलंय. लहान होती तेव्हा तिची सततची हालचाल, पळापळ मला झेपायची. तिच्या मागे तिच्या वेगाने धावणं, तिला न आवडणाऱ्या गोष्टी तिच्याकडून करून घेणं... जमायचं. ती रडारड करायची, हातपाय झटकायची, कधीकधी डोकंसुद्धा आपटायची... त्रास व्हायचा खूप. मग Occupational Therapy सुरु झालं, तेव्हा लक्षात आलं, तिला झोपाळा खूप आवडतो. विनीने तिला झोपाळ्यावर बसवलं, आणि ती एकदम शांतच झाली. झटापट थांबली, हातपाय झाडणं थांबलं, आणि पहिल्यांदा तिने विनीच्या डोळ्यात बघितलं. झोपाळा थांबल्यावर दुसऱ्या क्षणी माझं बाळ 'more' म्हणालं. त्या क्षणापासून तिचं झोपाळ्यावरचं प्रेम फक्त वाढतंच गेलं. मग एखादी गोष्ट तिच्याकडून करवून घेण्यासाठी झोपाळ्याचं आमिष दाखवणं, नेहमीचं झालं. लहान होती तोवर झोपाळे सहज उपलब्ध होते. तिच्याबरोबर तिच्या वयाची खेळणारी मुलं सुद्धा होती. पण आता... आता नाही शक्य होत. तिचं वय वाढलंय, शरीर पक्व व्हायला नाही म्हणलं तरी सुरुवात होईल... झालीय. आता जबाबदाऱ्या वाढल्यात. माझ्या... आणि खरं तर तिच्याही. आजकाल कोणतीही गोष्ट विचारली कि आधी उत्तर नाही हेच येतं. मग त्यावर चिडचिड, तिची तडफड, माझी तगमग... तिला नक्की काय हवंय, आणि ते कसं हवंय, हे माझ्याच लक्षात येत नाही अनेकदा. त्रास होतो. कठीण होतं.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जेवण झाल्यावर आईने सगळी भांडी डिशवॉशर मध्ये लाव असं सांगितलं. मी करते नेहमी ते काम. पण आज जेवणात कांदा होता. आईला वाटलं मला कळलं नाही कारण मी भाजी खाल्ली. पण मला कळलं. कांदा वाटून घातला आणि भाजी मला आवडणारी असली की मला कांदा आहे हे कळणार नाही असं अजूनही तिला वाटतं. दमते ती बिचारी. पण एखादा उंदीर मरून पडल्यावर किंवा सडलेल्या अंड्यांच्या वासाचा तिला जेवढा त्रास होतो ना, तेवढाच त्रास आणि तेवढाच वास मला येतो कांद्याचा. आता मी मोठी झालीय, म्हणून मी जेवण होईपर्यंत केलं सहन. भाजी खाल्ली थोडी. पण आता माझं डोकं दुखायला लागलंय. असं वाटतंय की हि सगळी भांडी फेकून द्यावीत दूर कुठेतरी. वेगाने पळत जावं लांब लांब आणि झोकून द्यावं दरीत एखाद्या स्वतःला. मग पुन्हा नाकातोंडात वारं भरेल, सगळे वास, सगळे आवाज बंद होतील आणि... मग मी शांत होईन. पण मला चांगलं वागायचंय... म्हणजे खरं तर... त्यांच्यासारखं वागायचंय. नाही सहन होत हा गोंगाट सगळा... वासांचा, आवाजांचा. पण मला शांत राहायचंय... पण नाही... पण... हो...

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुणी आहे ती तशी. गेल्या काही महिन्यात शाळा सांभाळून घरातली बरीच कामं करायला लागलीय. शाळा, थेरपी, होम थेरपी, आम्ही या सगळ्यातून वेळच मिळत नाही तिला कधी. शांत होण्यासाठी, शांत झोपण्यासाठी, खळखळून हसण्यासाठी. विनीच्या सेशन मध्ये त्या एका झुल्यावर तशी खळखळून हसायची. तेव्हा असं वाटायचं तिला सगळं जगच त्या झोपाळ्यावर देता आलं असतं मला, तर किती छान झालं असतं... आकार, रंग, अक्षरओळख, वाचणं, बोलणं... सगळं त्या झोपाळ्याच्या साहाय्यानेच झालं तिचं. पण इतर वेळी मात्र, कुठल्यातरी छोट्याशा वासाने, कुठल्यातरी घटनेने, आवाजाने, तिचं सगळं सगळं बिनसून जायचं. पण आता जशीजशी मोठी होतेय तसं बहुतेक तिला कळायला लागलंय. ती अचानक उठून आपल्या खोलीत निघून जाते कधीकधी, अगदी एखाद्या संभाषणाच्या मध्यावर सुद्धा, पण तिच्या त्रासाचा मला, आम्हाला त्रास होणार नाही, याची कुठेतरी तिला जाणीव व्हायला लागलीय असं मलाच जाणवयला लागलंय. आजदेखील भाजीत कांदा असूनसुद्धा तिने जेवण पूर्ण केलं! आमच्याबरोबर! हात धुताना बाथरूम मध्ये नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ होती खरी, पण आरडाओरडा नाही की खोलीत बंद करून घेणं नाही. तिला 'तुला त्रास होत नाहीये ना' असं विचारल्यावर 'नाही' म्हणाली. पण मला तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात तिचं खरं उत्तर दिसलं. 

पुढच्या आठवड्यात मोठी ट्रिप करणार आहोत, बालीला. मैत्रिणीने पाठवलेल्या तिथल्या एका व्हिडिओ मध्ये एक मोठा झोपाळा बघितलाय मी. एका दरीच्या अगदी शेजारी किंवा काठावरच आहे जणू. त्या झोपाळ्यावर हिला बसलेलं बघायचंय मला. तो झोका उंच उंच गेला की मग हिच्या कानांत वारा भरेल, डोळे मिटून ही खळखळून हसेल, सगळ्या जगाचा हिला विसर पडेल. आणि ह्या वेळी माझ्या डोळ्यात बघून माझं बाळ म्हणेल, 'more'.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-समृद्धी 

Sunday, July 11, 2021

उपज

 "बाबा, तू ठीक आहेस? चित्रा आत्याचा फोन आला... मैफिलीतून मधूनच उठून गेलास.. हे असं दुसऱ्यांदा घडतंय बाबा... It's about time... झाले आता.. वर्ष होऊन गेलं आता. अजून किती वेळ घेणारेस सावरायला? आणि इतका त्रास होत असेल ना, तर मग गाण्याचे कार्यक्रम नको घेत जाऊस. लोक तुला ऐकायला मुद्दाम प्रवास करून येतात... " शर्वरी थोडी चिडलीच होती. पण तिच्या बोलण्यातली कळकळ अभिला जाणवत नक्की होती. विशाखा गेल्यापासून हा पहिलाच मोठा कार्यक्रम घेतला होता अभिने. नाही म्हणायला एक छोटी मैफल केली होती एका मित्राकडे... पण तेव्हाही गाता गाता अचानक अभिजीतला भरून आलं तिच्या आठवणीने आणि तो चक्क बंदिश अर्धीच सोडून निघून गेला. सगळेच जवळचे, त्यामुळे ह्याचा फार गवगवा झाला नाही. पण त्यानंतर आलेले चारेक कार्यक्रम अभिने असेच सोडून दिले, मानसिक तयारी नाही म्हणून. अखेर परवाचा कार्यक्रम. कुठेतरी सुरुवात करायची म्हणून, आणि चित्राचा आग्रह म्हणून अभिने गायला होकार दिला होता. सुरुवात ठीक झाली. अगदी नेहमीसारखी रंगत नसला तरी रागविस्तार होत होता. दोन राग गाऊन झाल्यावर अभिने ठुमरी गाणार असं म्हंटलं, आणि प्रेक्षकांमधून 'याद पिया कि आए' ची फर्माईश आली. अभिच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. विशाखाचं प्रेम होतं ह्या ठुमरीवर... 

विशाखाचं निदान झालं तेव्हा अभि दौऱ्यावर होता. तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर हे नुसतं ऐकूनच अभि सैरभैर झाला होता. दौरा अर्धवट टाकून तो आला तोच तणतण करत. आपल्या हाताबाहेर काही गोष्टी आहेत ही जाणीवच अभिसाठी त्रासदायक होती. विशाखाचं असणं, तिच्या असण्याचं त्याच्या आयुष्यात असलेलं गृहीतक, ह्या सगळ्याला विशाखाच्या अचानक आलेल्या आजारपणामुळे तडा गेला होता. रियाजाशिवाय आपण एकही दिवस जगू शकत नाही ह्या अभिच्या समजुतीलासुद्धा धक्का बसला होता. निदान झाल्यापासून पुढचे दोन-तीन महिने विशाखाच्या उपचारांमध्ये, अभि स्वतःचं गाणं थोडं विसरूनच गेला होता. नाही म्हणायला शरू-शंभू मदतीला होत्या, पण त्यादेखील त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळून. शाम्भवीच्या परीक्षा, तिचा अभ्यास, आणि शर्वरीचा संसार ह्यात विशाखाच्या आजारपणासाठी वेळ देणं दोघींनाही कठीण जात होतं... आणि खरं तर विशाखालाच ते मान्य नव्हतं. मग पुढच्या काही महिन्यात कीमो-रेडिएशन ह्या सगळ्यात विशाखा हळूहळू कोमेजत गेली, आणि कॅन्सर मात्र वाढत गेला. 

विशाखाला मृत्यूची जाणीव झाली होती. शेवटच्या काही दिवसांमध्ये ती बराच काळ लॅपटॉपवर घालवत होती. तिने अभिला रियाझ पुन्हा सुरु करायला भाग पाडलं होतं. तिच्या आवडत्या बंदिशी, राग, नवीन रचना, ठुमरी... अभिकडून म्हणवून घेऊन ती जणू साठवून घेत होती. बरंच काही इतरही ऐकत होती, लिहीत होती. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या तिच्या सगळ्या कथा-कविता शम्भूकडून तिने मुद्दाम मागून वाचल्या होत्या. कित्येक वर्षांनंतर विशाखा पूर्णतः आत्मकेंद्रित झाली होती, आणि ह्याचं सगळ्यांनाच खूप अप्रूप वाटत होतं. अभिला काहीच सुचत नव्हतं, आणि विशाखा दिवसेंदिवस शांत होत होती. शांततेतच ती निघून गेली आणि अभि कोलमडून गेला. 

'याद पिया कि आये' ची फर्माईश आली, आणि ह्या सगळ्या आठवणी अंगावर धावून आल्या. अभिने स्वतःला सावरलं, आणि गायला सुरुवात केली. पण त्याचा घसा दाटून आला.. आवाज लागेनासा झाला.. आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला फक्त शब्द दिसले... त्याभोवतीचं संगीत मात्र कुठेतरी हरवून गेल्यासारखं झालं. आतापर्यंत इतकी रंगणारी ठुमरी आज त्याला गाताच येत नव्हती. काही म्हणजे काही सुचतच नव्हतं... वेड्यासारखा... अभि स्वरमंडळ खाली ठेवून श्रोत्यांना नमस्कार करून निघून गेला. शाम्भवीने पुढे काय केलं; श्रोत्यांना, आयोजकांना कसं समजावलं; कसलीच अभिला शुद्ध राहिली नव्हती. 

"बाबा, कोणीतरी नचिकेत म्हणून भेटायला आलेयत तुला. आईसंबंधी काहीतरी आहे म्हणाले. काय सांगू?" शाम्भवीने अभिची तंद्री मोडली. 'भेटतो' असं म्हणून अभि दरवाजाशी आला. त्याच्याच वयाचा, चेहऱ्याने ओळखीचा एक माणूस दरवाज्यात उभा होता. पाठीवरच्या बॅगकडे आणि त्याच्या दमलेल्या चेहऱ्याकडे बघून हा नचिकेत बराच लांबचा प्रवास करून आला होता, हे सहजंच कळत होतं. अभि दिसल्याबरोबर नचिकेतने हात जोडून नमस्कार केला. त्याच्या हसण्यात का कोण जाणे, अभिला विशाखाचाच भास झाला. "तू मला फारसा ओळखत नाहीस.. पण मला तू बराच माहित आहेस. माफ कर, तुम्ही ना म्हणता तू म्हंटलं तुला. पण आपण साधारण एकाच वयाचे आहोत, आणि तुला ओळखणारी सगळी मंडळी तुला अरे तुरे करतात, म्हणून..." नचिकेतच्या ह्या अशा बोलण्याने अभिच्या चेहऱ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. "आत या... ये. शंभू, जरा चहा वगैरे बघतेस?" नचिकेत येऊन बसला, शाम्भवीने आणलेला चहा घेऊन झाला, तरीही अभिच्या चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह कायम होतं. अखेर नचिकेतनेच बोलायला सुरुवात केली आणि हळूहळू अभिला बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. 

"जवळजवळ दीड वर्षांपूर्वी मला विशाखाची ई-मेल आली. तशा आमच्या इमेल्स नेहमीच असायच्या, फोन वरून सुद्धा संपर्क होताच. पण ह्या ई-मेल चं कारण तिचं नव्याने झालेलं निदान होतं. तिला कॅन्सर झाला होता आणि आपण ह्यात जाणार हि तिची खात्रीसुद्धा झाली होती. तू दौऱ्यावर होतास आणि तिला तिच्या जवळच्या माणसाची खूप गरज होती. तुझ्या गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये ही बातमी तुला दिली तर तू बेचैन होशील, तुझं लक्ष लागणार नाही, आणि आयोजकांना त्रास होईल... अशा विचारानं तिने तुला हि बातमी सांगायला टाळाटाळ केली. शेवटी माझ्या आग्रहाखातर म्हण, किंवा माझ्या धाकाने म्हण... विशाखाने शरुला कळवलं, आणि तिने तुला."

अभिला हे नक्की काय ऐकतोय हेच कळत नव्हतं. आजतागायत कधीही न भेटलेला हा मनुष्य घरातल्या सगळ्यांबाबत इतक्या सहजतेने बोलत होता कि जणू तो कुटुंबाचाच भाग असावा. अभिच्या मनातल्या ह्या शंकांची जाणीव नचिकेतला झाली असावी. 

"तुला सगळं सांगायचं हे ठरवूनच आलोय. तू गोंधळून गेला आहेस. साहजिक आहे. मी कोण हे सांगण्याआधीच मी विशाखापर्यंत पोचलो बघ. माझी आणि विशाखाची ओळख तुझ्याच एका कार्यक्रमात झाली. ती तुझी बायको आहे हे कळण्यापूर्वीच तुझ्या गाण्यावर मी ताशेरे मारले होते. 'हा गायक ताकदीचा आहे पण थोडी उपज कमी पडतेय...' असं मी म्हंटलं, आणि त्यावर 'उपज ह्या शब्दाचा तुम्हाला उमगलेला अर्थ नक्की काय हो' हा प्रश्न मला तिने विचारला. मग गाणं उमजणे, समजणं, सादरीकरण, अशा सगळ्या तांत्रिक गोष्टींबद्दल आमच्या गप्पा सुरु झाल्या. तुझं गाणं, त्यातले बारकावे, त्यातली चमत्कृती मला समजावून सांगण्यात मग पुढचा सगळा वेळ आम्ही घालवला. कार्यक्रम संपल्यावर मी तिचा संपर्क घेतला आणि तेवढ्यात तुझी बायको अशी तिची ओळख सुद्धा कळली. तिच्याबद्दल कुतूहल गप्पांमध्ये निर्माण झालं होतंच. ही नवीन ओळख कळल्यावर आदरही वाढला. मग कधी तुझ्या नवीन येणाऱ्या रेकॉर्डिंग्स च्या निमित्ताने, तर कधी असंच गाण्याबद्दल अशा आमच्या गप्पा सुरु झाल्या. हळूहळू गप्पांचे विषय रुंदावत गेले, चर्चा वाढत गेल्या. प्रत्यक्ष फार कधी भेटलो नसलो तरी फोन, पत्रं, नंतर मेसेज, इमेल्स ह्यातून सहवास सतत होताच. जवळीक ही अशीच वाढत गेली..."

"माझाही संसार होताच. कामामुळे माझं अधूनमधून बोलणं कमी झालं कि तिच्याकडूनच एक झणझणीत पत्र यायचं. आवडायचं. मग पुन्हा विशाखाची बाळंतपणं, त्यानंतर तिला झालेले त्रास... ह्या सगळ्या बाबतींत मी म्हणजे तिचं मोकळं होण्यासाठीचं एक हक्काचं माणूस होऊन गेलो. तिने लेखनाला सुरुवात केली तेव्हा पहिले ड्राफ्ट्स मला ई-मेल मधून मिळायचे. सुरुवातीला भावनिक असणारं तिचं लिखाण परिपक्व होताना मी पाहिलंय. आमच्यातलं नातं देखील तसंच परिपक्व होत गेलं. आम्हा दोघांना एकमेकांची सवय झाली होती. काही हळव्या क्षणी तिचं असणं हे प्रत्यक्षात मिळावं अशी मागणी सुद्धा केली मी तिच्याकडे... पण... असो. कॅन्सरच्या निदानानंतर तिच्या इमेल्स वाढल्या. रोज २-३, कधी कधी ५ सुद्धा. भडाभडा बोलून टाकल्यासारखी लिहीत होती. तुझ्याबद्दलची काळजी, प्रेम, तगमग...  तुम्हा दोघांच्या जुन्या आठवणी... ह्या सगळ्याबद्दल चाललेलं तिचं चिंतन असायचं त्या सगळ्यांत. मग एक ई-मेल आली, तब्ब्येत खूप खालावलीय, अजून किती लिहीन माहीत नाही. अभिजीतला भेटून जा... बोलून जा."

नचिकेतला दाटून आलं होतं. स्वतःला सावरण्यासाठी त्याने पाण्याचा घोट घेतला. 

अभिच्या मनात मात्र प्रश्नांची गर्दी झाली होती. त्याला थोडा धक्का देखील बसला होता. विशाखाच्या... त्याच्या विशाखाच्या आयुष्यात अशी कोणी इतकी जवळची व्यक्ती असावी आणि त्याची अभिला कल्पनासुद्धा नसावी हा विचार त्याला झेपत नव्हता. त्यांच्या संसारात अभिला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नव्हती. विशाखाने त्याच्या गायनात, त्याच्या आयुष्यात कायम साथ दिली होती. मुलींसाठी सुद्धा आई कायम सोबत होती. मग हे असं सगळं असताना विशाखाच्या आयुष्यात नचिकेतचं असणं हे कोणालाही जाणवू सुद्धा नये... एका प्रकारे विशाखाने आपली यशस्वीरीत्या फसवणूक केली अशी काहीशी भावना अभिच्या मनात आली. बहुधा ह्याचीसुद्धा जाणीव नचिकेतला झाली की काय कोणास ठाऊक, पण तोच म्हणाला,

"विशाखा तुझ्याशी खोटं बोलली, तुला फसवलं असा विचार खरंच करू नकोस अभिजीत. तुम्हा दोघांच्या नात्याबद्दल बोलण्याचा अधिकार मला नाही... तिने कधीच दिला नाही. पण मला कायम वाटत आलं कि तिने एक बायको, एका प्रसिद्ध गायकाची पत्नी, त्याच्या मुलींची आई ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडल्या. पण त्याच वेळी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून असलेली तिची स्वतःबद्दलची जबाबदारी सुद्धा तिला पार पाडणं गरजेचं होतं. तू स्वयंभू होतास, पण तुला जपण्याच्या नादात स्वतःचं मोडकळीला येणं तिला थांबवायचं होतं. अशाच कुठल्या तरी क्षणी मी तिला सापडलो, आणि मलाही मी गवसलो, असं समज. तिची शेवटची ई-मेल मिळाल्यानंतर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तिला शेवटचं भेटायला मिळावं म्हणून निघणार होतो. पण दुसऱ्याच दिवशी बातमी कळली ती गेल्याची. मी थांबलो. तसंही 'तुला' भेटायला तिने सांगितलं होतं. मग इतक्यातच कळलं तुझ्या मैफिलीतून उठून जाण्याबद्दल. वाटलं काहीतरी असंच... म्हणून अखेर जे मिळेल त्या विमानाने आलो इथे. खरं तर तुला भेटलोच नसतो, तुला हे काही कधी कळलंच नसतं, तरीही चाललंच असतं. पण मला अगदी पहिल्या भेटीत विशाखा म्हणाली होती तसं... एखाद्या रागाचे आरोह-अवरोह, एखादी बंदिश, चलन हे शिकलं ना, कि राग समजू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी घोटल्या, पुन्हा पुन्हा रियाझ केला, कि त्या रागाची खोली कळायला लागते, आणि तो राग उमजतो. त्याही पुढे जाऊन त्या रागाचा सर्वांगाने विचार केला, तो खूप ऐकला, त्याला स्वतःच्या जाणिवांची जोड दिली कि अनाहूतपणे जे हाती येतं... ती उपज. विशाखाच्या बाबतीतलं तुझं उपज अंग चांगलं व्हावं म्हणून आलो... असं म्हणूया हवं तर."

अभिचं डोकं जड झालं होतं. विचारांचा कल्लोळ उडाला होता मनात. थिजल्यासारखा अभि सोफ्यावर बसून राहिला. नचिकेतला पुढे काय उत्तर द्यावं, सभ्यपणे पाहुणचार करावा, धक्के मारून बाहेर घालवून द्यावं, उत्तरं जाणून घ्यावीत, कि जाब विचारावा... काही म्हणजे काहीही अभिला कळत नव्हतं. शाम्भवी काहीतरी खायला घेऊन आली. पुढचा अर्धा तास नचिकेत शाम्भवीशी बोलला, विचारपूस केली आणि निघूनही गेला. अभि मात्र कुठेतरी हरवल्यासारखाच होता. 

त्या रात्री अभि खूप बेचैन झाला. विशाखाचं नसलेपण अंगी पडणं सोडाच, पण तिचं असणंसुद्धा आपण पूर्ण कधी अनुभवूच शकलो नाही ह्या भावनेने त्याला घेरून टाकलं होतं. आपण कुठे कमी पडलो का, आपण स्वार्थीपणा केला का, तिला दुसऱ्या कोणाची तरी जवळीक वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली... का झाली... त्यात दोष कोणाचा? किंबहुना... दोष असावा तरी का? की फक्त स्वभाव आणि भावना? आपल्याला सोबत देणारी विशाखा आणि नचिकेतकडे मोकळी होणारी विशाखा... नक्की कोणती विशाखा आपल्याला समजली? आणि कोणती निसटली? एकच राग दोन वेगवेगळ्या व्यक्ती गातात ना, तेव्हादेखील त्या रागाची वेगळी अंगं दिसतात. व्यक्तीच्या स्वभावानुसार, त्याच्या प्रकृतीनुसार, रागाचं स्वरूप बदलतं. म्हणजे पहिल्या व्यक्तीला उमजलेला राग योग्य आणि दुसऱ्याला उमगलेला चूक, असं नसतंच ना! आयुष्य संपून जातं, पण राग पूर्ण सिद्ध झाला... असं फार क्वचितच होतं. 

पहाटे शाम्भवीला तंबोऱ्याच्या स्वरांनीच जाग आली. पहाटेच्या रागाच्या आलापीऐवजी वेगळेच सूर ऐकू आले. रागांच्या वेळा रियाजाच्या वेळी सुद्धा पाळणारा अभि भिन्न षड्जाचे सूर लावत होता बहुतेक. पलंगावर बसून अभिने सहज 'याद पिया कि आये' ची सुरुवात केली. पुढची २०-२५ मिनिटं अभि भान हरपून गात होता. शाम्भवी थक्क होऊन ऐकत होती. ठुमरीची उपज अभिला आज खरी जमली होती.    

- समृद्धी 


Picture Credits: अमित उपाध्ये आणि सोनाली हर्डीकर 


Saturday, January 30, 2021

We'll look good together!

 १. 

आज खरं तर त्याला शाळेत जायचंच नव्हतं. गेले दहा दिवस जवळजवळ रोज सगळे 'ढापण्या' म्हणून चिडवत होते. त्यांच्या वर्गात तो एकटाच चष्मीश झाला होता, आणि त्यामुळे मुलांना खेळण्याचं आणि चेष्टेचं एक नवीन साधन मिळालं होतं. म्हणजे तसं म्हणायला कोणी त्याला अगदीच त्रास देत नव्हतं... पण 'ढापण्या' उपाधीपासून त्याची सुटका होण्याची सुद्धा चिन्ह दिसत नव्हती. 

शाळेची घंटा झाली आणि सगळे जागेवर जाऊन बसले. शिक्षिका वर्गात आल्या. त्यांच्या मागोमाग आणखी एक मुलगी आत आली. टप्पोरे डोळे, डोक्यावर हेअरबँड, पॉपीचं चित्र असलेली बॅग आणि नवा कोरा युनिफॉर्म घालून आलेली ती अगदी बाहुलीसारखी होती. सगळ्या मुलांमध्ये उत्सुकतेने कुजबुज सुरु झाली. बाईंनी सगळ्यांना तिची ओळख करून दिली, उंचीनुसार तिला मधल्या रांगेत तिसऱ्या बाकावर बसायला जागा नेमून दिली. त्याच्या चष्म्याच्या कोपऱ्यातून तो हे सगळं बघत होता. 

हजेरी पूर्ण झाल्यावर बाईंनी सगळ्यांना त्यांच्या वह्या काढायला सांगितल्या. तिनेसुद्धा आपल्या बॅगमधून छान कव्हर घातलेली वही काढली, कंपासपेटी काढली... आणि मग आणखी एक कंपासपेटी बाहेर काढली. तिच्या शेजारी बसलेल्या निकिताने कुतूहलाने बघितलं तर काय... तिने पेटी उघडून एक छोटासा चष्मा डोळ्यावर चढवला होता. न राहवून निकिता गालातल्या गालात हसायला लागली. मधली सुट्टी होईपर्यंत सगळ्या वर्गाने वळुनवळून तिच्याकडे बघून घेतलं... घंटा झाली आणि ती कावरंबावरं होऊन चक्क बाकावर तोंड लपवून रडायलाच लागली. 

सगळी मुलं आपल्या गप्पांमध्ये मश्गुल होती. तेवढ्यात तिच्या मांडीवर कोणीतरी एक छोटीशी पेटी सरकवली. तिच्या चष्म्याच्या पेटीसारखीच होती अगदी... तिने उघडून पाहिली तो ती रिकामीच... डोकं वर काढून तिने त्या दिशेला पाहिलं... तो त्याच्या चष्म्याच्या काचांमधून तिच्याकडे बघून 'हाय' करत होता. डोळे पुसून तिने आपला चष्मा पुन्हा चढवला, आणि गोड हसून ती डबा घेऊन त्याच्यापाशी गेली.

तब्बल दहा दिवसांनंतर पहिल्यांदाच त्याच्या ढापणांना जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. 


२. 

"सारखा सारखा चष्मा कसा कुठेतरी विसरतोस रे?! इतकी वर्षं झाली... थोडातरी व्यवस्थितपणा नको का..." वैतागून आई बाबांना बोलायची. तिच्या आवरावरीमध्ये बाबांचं "छ्या... हा चष्मा कुठे दिसत नाही बघ... अगं जरा बघतेस का.... मला काही सुचत नाहीये..." वगैरे सुरु झालं.. की आईला जाम राग यायचा. आणि बाबांना अगदी त्यांच्यापासून हातभर लांबीवर असणारा चष्मासुद्धा सापडायचा नाही. त्यात खरंतर दृष्टीपेक्षा वेन्धळेपणाचाच भाग जास्त होता. पण त्यामुळे आईची आणखी चिडचिड व्हायची. बाबांचा चष्मा हा आईच्या डोक्याचा एक ताप झाला होता. 

आज मात्र गोष्ट थोडी वेगळी होती. आज आईला चष्मा लागलाय हे कळलं होतं. चष्म्याची फ्रेम विकत घेताना आईने केलेल्या गोंधळाच्या वेळी बाबांना मनापासून हसू आलं होतं. नवीन दागिन्याची काळजी कशी घ्यायची हे आईला कळल्यावर तर..."अरे तू थोडी तरी काळजी घेत जा तुझ्यासुद्धा चष्म्याची..." हे बाबांना पुन्हा ऐकायला लागलं होतं. 

आईचा चष्मा घेऊन दोघे घरी आले, आणि दोन्ही चष्म्याची कव्हर्स टीव्ही जवळच्या टेबलावर स्थानापन्न झाली. हातपाय धुवून झाल्यावर चहा करून बाहेर आई घेऊन आली.. तोवर बाबांनी लॅपटॉपवर काम सुरु केलं होतं. आई पेपरची पुरवणी वाचायला घ्यायची म्हणून चष्मा घालायला गेली तर चष्म्याचं कव्हर रिकामंच. आता मात्र आई कावरीबावरी झाली. रोज बाबांना केलेल्या कटकटीची तिच्या मनात उजळणी झाली. आपणसुद्धा त्यातलेच कि काय... वगैरे मनात विचार यायला लागले... 

"काय शोधतेयस गं?" ज्या प्रश्नांची भीती होती, तो बाबांचा प्रश्न आलाच... "अरे माझा चष्मा..." असं म्हणून आई वळली.. आणि स्वतःचा चष्मा खिशात आणि तिचा चष्मा स्वतःच्या डोळ्यावर चढवून काम करत बसलेले बाबा खो-खो हसत सुटले. 

आजकाल आईबाबांमध्ये चष्मा हरवण्यावरून वाद होत नाहीत. टेबलावर असलेली दोन्ही कव्हर्स त्यांच्या सहजीवनाचा आनंद पुरेपूर लुटत असतात. 


३. 

"काय गं, एवढी मोठ्ठी फॅमिली आहे का गं दादूष्काची?"

"कोण? ओह.. निकोलाई... हो. आज त्यांची नव्वदी साजरी करायला आलेत. त्यांच्या दोन्ही मुली, जावई, ३-४ नातवंडं..."

"मुली कोण गं?"

"ती रेड हेडेड आहे ना, ती मोठी मुलगी, आणि ती टोपी घातलेली आहे बसलेली, पाठमोरी, ती धाकटी."

"ए दादूष्का रेड हेडेड होते का ग तरुणपणी? कारण तानिश्का तर blonde केसांची आहे."

"हं?"

"ए ती मोठ्या मुलीबरोबर आहे ती कोण गं?"

"आई आहे ती त्यांची. निकोलाई दादूष्काची बायको."

"म्हणजे? अगं... मग तानिश्का? अगं मी इतके दिवस समजत होते, तातियाना आणि निकोलाई are married... ते नेहमी एकत्रच तर असतात ना... आणि आत्तासुद्धा... Oh my god! म्हणजे?"

"अगं... ताती आजी २ वर्षांनी मोठी आहे. निकोलाई जेव्हा इथे आले, तेव्हा ताती आजीला येऊन एक वर्ष होऊन गेलं होतं. तिचा विसराळूपणा वाढत चालला असला तरी ती तशी independent होती. निकोलाईचा dementia मात्र बराच advanced होता. बऱ्यापैकी dependent, wheelchair-bound होते. सोशल सर्कल च्या वेळी एके दिवशी एकमेकांना भेटले दोघे. बिंगो खेळताना शेजारी बसले होते. निकोलाई चष्मा विसरला.. तातिने स्वतःचा दिला. नक्की निकोलाईच्या मनात काय झालं माहिती नाही, पण त्या दिवसापासून दोघे एकमेकांशी नवरा-बायको समजून बोलतात. तातिच्या नवऱ्याला जाऊन बरीच वर्षं झालीयत. दोन्ही मुलं अधूनमधून भेटायला येतात. पण ताती निकोलाई बरोबर असल्याशिवाय कोणाला भेटायचं नाही असंच म्हणते."

"पण मग दादूष्काची बायको? त्या कसं काय चालवून घेतात? आणि फॅमिली?"

"निकोलाई सुद्धा तातीला सोडून जात नाही. स्वतःची, जगाची, काळाची ओळख विसरत चाललेल्या माणसाबरोबर राहणं खूप कठीण असतं अगं.  आम्ही जेव्हा ह्या प्रकाराबद्दल पहिल्यांदा त्यांना सांगितलं, तेव्हा आजींना थोडा त्रास झाला. पण institutionalize करायला लागलेला आपला नवरा एकटा नाहीय हा दिलासाही त्यांना मिळाला. समजून घेतलंय त्यांनी. आज मला म्हणाल्या, Today I told Tatiyana, I am his old flame who is here to wish him birthday... she was so jealous... आणि खदखदून हसल्या."

"मजाच आहे ग सगळी... वेगळंच काहीतरी..."

"They do look good together..."


४.

नवा कोरा चष्मा त्याच्या नव्या कोऱ्या कव्हर मध्ये घरी येतो. जसे मोठे होत जातो, तशी उंची बदलत जाते, दृष्टी बदलत जाते, दृष्टिकोन बदलत जातात. चष्म्याचे नंबर बदलून घ्यायला लागतात. मग कधीतरी उंची वाढायची थांबते. पण आजूबाजूचं जग बदलत जातं. नंबर तोच राहतो, फ्रेम्स बदलून आपण बदलत्या जगाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत राहतो. मग कधीतरी अचानक डोळ्यांचा चष्मा त्याच्या कव्हर मध्ये कायमचा बंदिस्त होतो आणि गोष्ट पूर्ण होते. 


- समृद्धी 


Sunday, June 28, 2020

बालगोष्ट १: ग्रहांची सहल

एकदा काय झालं, सूर्याने (Sun) ठरवलं की सगळ्या ग्रहांची (Planets) सहल न्यायची. मग सूर्याने सगळ्या ग्रहांना त्यांच्या बॅग्स, डबे आणि पाण्याच्या बॉटल्स घेऊन यायला सांगितलं. सगळे ग्रह सांगितलेल्या वेळेला सूर्याकडे येऊन हजर झाले. सूर्य आणि सगळे ग्रह तिथून बसमधून एका पार्कमध्ये गेले. तिथे सगळे मिळून खूपखूप खेळले, खूप दंगा केला आणि मग दमले. सूर्यदादा म्हणाला,” चला चला आता जेवायची वेळ झाली. सगळ्यांनी स्वच्छ हात धुवून घ्या, आणि डबे काढा. आज मी बघणार आहे कोण कसं जेवतय ते. आणि सगळ्यात छान जेवणाऱ्या ग्रहाला माझ्याकडून एक छानसं बक्षीस!”

बक्षीस ऐकताच ग्रहांनी डबे काढण्याची घाई केली. बुध (Mercury) आणि शुक्र (Venus) दोघांना लागली होती खूप खूप भूक. त्यांनी हात न धुताच डबा काढला. बुधच्या डब्यात होता चिवडा आणि शुक्राच्या डब्यात होते लाडू. दोघांनी इतरांसाठी न थांबता गपागप चिवडालाडू फस्त करून टाकले. सूर्यदादा हे बघत होता. 

पृथ्वी (Earth), मंगळ (Mars), गुरु (Jupiter) आणि शनी (Saturn) सगळे हात धुवून आले आणि त्यांनी आपापले डबे काढले. पृथ्वीने डब्यात आणली होती पोळी आणि भाजी, मंगळाने आणला होता ब्रेड आणि जॅम, गुरूने आणला होता पिझ्झा आणि शनीने आणला होता पुलाव. मंगळाला जॅम खूपच आवडायचा म्हणून त्याने सगळं जॅम आधी चाटून खाऊन टाकला, आणि उरलेला ब्रेड तसाच पुन्हा डब्यात ठेवून दिला. गुरूला पिझ्झावरचं चीज खूपच आवडायचं, म्हणून गुरूने ते काढून खाऊन टाकलं, आणि उरलेला पिझ्झा तसाच ठेवून दिला. सूर्यदादा हेही बघत होता.

पृथ्वी आणि शनी मात्र त्यांचे डबे शांतपणे खात होते. दोघांनी आपापले डबे संपवले आणि पुन्हा बॅगमध्ये भरून ठेवले. शनीने आपले हात पटकन पॅन्टला पुसले आणि तो पाणी प्यायला लागला. पृथ्वीने डबा ठेवला, आणि ती पार्कमधल्या सिंकपाशी जाऊन पटकन हात धुवून, बरोबरच्या रुमालाला पुसून जागेवर येऊन बसली. सूर्यदादा हेसुद्धा बघत होता.

युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) डबा घेऊनच नव्हते आले. त्यांना पार्कमधलं आईस्क्रीम खूपच आवडायचं. त्यांनी जेवणाची वेळ होताच चक्क पळ काढला आणि मस्तपैकी जाऊन दोनदोनदा आईस्क्रीम खाऊन घेतलं. सूर्यदादांचं इथेसुद्धा लक्ष होतं.

सगळ्यांचं खाऊन झालेलं बघताच सूर्यदादाने बोलायला सुरुवात केली. “ मी जेवायची वेळ झाली हे सांगितल्यापासून आत्तापर्यंत माझं सगळ्यांकडे पूर्ण लक्ष होतं. अगदी जे इथे न थांबता गुपचूप आईस्क्रीम खाऊन आले त्यांच्याकडे सुद्धा.”
युरेनस आणि नेपच्यून वरमले. सूर्यदादा पुढे बोलायला लागला.

“ आज सगळ्यात छान जे दोघे जेवले आहेत ते म्हणजे पृथ्वी आणि शनी. त्यांनी स्वतःचे डबे आणले, जेवण्यापूर्वी हात धुतले, डब्यात दिलेलं सगळं.. अगदी सगळ्या भाज्यांसकट संपवलं. फक्त जेवणानंतर हात धुवायला शनी विसरला आणि त्याने हात कपड्यांनाच पुसून टाकले. पृथ्वीने मात्र तिची भाजीपोळी छान खाल्ली, बाहेर सांडलं नाही आणि नंतर हातही धुतले. म्हणूनच… म्हणूनच आजचं बक्षीस मिळणार आहे.. पृथ्वीला.”

सूर्यदादाने पृथ्वीला जवळ बोलावलं आणि तिच्या हातात सप्तरंगी इंद्रधनुष्य (Rainbow) दिलं. “आजपासून जो चांगलं जेवेल आणि जेवणापूर्वी आणि नंतर नीट हात स्वच्छ करेल, त्यालाच हे इंद्रधनुष्य दिसेल.” असं सांगून सूर्यदादा सगळ्या ग्रहांना घेऊन पुन्हा आपल्या घरी गेला.

तुम्ही घरी छान जेवता का? आणि पृथ्वीने केलं तसे हातही स्वच्छ करता का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे… तुम्हाला इंद्रधनुष्य दिसलंय का?

-समृद्धी 

Saturday, April 25, 2020

आधार

"बऱ्याच दिवसांत आरतीबद्दल काही बोलली नाहीस. सगळं ठीक ना?" रश्मीचा प्रश्न आला.
"अगं, बोलायचं काय त्यात? इतक्यात आमच्यातच काही बोलणं झालं नाहीये बघ.. आणि खरं तर आता तुझ्याशी मी तिच्याबद्दल बोलायलाच नको. Now that I am coaching her. In a way, client-coach confidentiality म्हण." विभा उत्तरली.
"खरं सांगू विभा, तू तिला life-coaching करतेयस, पण ती भेटल्यापासून तुझीच मनस्थिती जास्त सुधारलीय." रश्मी हसत म्हणाली. " बरं, माझे reports झालेयत. मी कल्टी मारते. सोमवारी भेटूच." रश्मीने बॅग उचलली आणि ती निघाली.
विभा मनाशीच हसली. आरतीला भेटून तसे २-३ महिनेच झाले होते. पण अगदी पहिल्या भेटीपासूनच तिच्याबरोबर काही वेगळेच बंध जुळले होते विभाचे. अगदी विचित्र काळात आरती विभाच्या आयुष्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वीचा तो फोन कॉल विभाला आठवला.

"I told you not to call me at my work... can't you get it?" विभा वैतागून फोनवर बोलली, ओरडलीच खरं तर.
"It's 5'o clock. Your clients are done. Don't fool me... and honestly, I don't care. I need those keys." पलीकडून तरुणही तितक्याच जोरात ओरडला.
"मिळणार नाहीत. मी त्या गाडीचे हफ्ते भरलेयत." विभा तणतणली.
"I did the down payment. And the car is on my name. तुझी आजी गेली परवा म्हणून I have waited for 3 days... Not any more. I am taking the car tomorrow. That's final. Use your old damn car. pathetic!" पलीकडून तरुणने फोन आपटला.
"Bloody..."
"hi... मी... चुकीच्या वेळी आलेय का?" मागून आवाज आला.
विभाने मागे वळून पाहिलं, तो एक तिशीतली मुलगी सरळ केबिनच्या दरवाज्यात येऊन उभी होती. "रश्मी आज क्लिनिक लॉक न करता गेली की काय!" विभा मनातल्या मनात म्हणाली.
"सॉरी, I am almost done. We don't take any clients after 5.... Wait... are you a client? तुम्ही मराठीत बोललात माझ्याशी..." विभा भानावर आली.
"नमस्कार, मी आरती. तुम्ही roommate शोधत आहात ना? मला कळलं. म्हणून आलेय भेटायला."
"ओह... पण मी अजून जाहिरात दिली नाहीये... आणि तसं नक्की ठरलंही नाहीये अजून... फक्त रश्मीला बोलले.. ओह.. ok... Please do come in..." विभा आरतीला म्हणाली. "मला please अहो-जाहो म्हणू नका... नकोस... बस ना."
आरती बसली. जुजबी ओळख झाल्यावर विभाने आरतीला खरी गोष्ट सांगितली. विभाचा नुकताच break-up झाला होता. कधी काळी तिच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या तरुणची तिला आता नव्याने ओळख होत होती. विभाला त्याने मानसिक त्रास तर दिलाच होता पण त्याबरोबर आर्थिक बाबीत सुद्धा चांगलाच इंगा दाखवला होता. त्यात विभाची आजी दोन दिवसांपूर्वीच वारली होती. इतर वेळी सगळं सोडून विभा लगेच flight पकडून मुंबईला गेली असती; पण तरुणच्या विचित्रपणामुळे आणि त्यात स्वतःच्या क्लीनिकच्या जबाबदाऱ्यांमुळे विभाला नाईलाजाने इथेच थांबावं लागलं होतं. क्लीनिकचं लोन आणि त्यात हि सगळी परिस्थिती... कदाचित आता roommate ठेवली तर आर्थिक ताण थोडा कमी होईल की काय असा विचार फक्त एकदा तिने रश्मीला बोलून दाखवला... आणि लगेच आज ही मुलगी इथे...
"नाही म्हणजे अजून तुमचं... तुझं नसेल काही ठरलं तरी हरकत नाही... माझंही तसं ठरलं नाहीच आहे.. म्हणजे.. वेगळं राहणं.." आरती म्हणाली.
"मला कळलं नाही. तू चौकशी करायला आली आहेस कि नाही? रूम शोधतेयस की काही थट्टा चाललीय माझी? This is honestly the worst possible time for all this non-sense. मला सुद्धा कळत नाहीये... मी तुला माझ्याबद्दल सगळं का सांगत्येय.. who are you?" विभाचा धीर संपत चालला होता.
आरती दोन मिनिटं काहीच बोलली नाही. मग एकदम उठून म्हणाली, "मी येते. तुला घरी जायला तसाही उशीर होतोय. मी उद्या याच वेळेला पुन्हा येईन." आणि विभा काही उत्तर देण्याच्या आत आरती तडक निघून गेली.
विभाला सगळाच प्रकार विचित्र वाटला होता. पण दुसऱ्या दिवशी आरती पाच वाजून पाच मिनिटांनी खरोखरीच हजर झाली. त्यादिवशी मात्र दोघींच्या छान गप्पा झाल्या. विभाला आरतीच्या घरची परिस्थिती लक्षात आली. आरतीच्या लग्नाला तीन वर्षं होऊन गेली होती. मुलं नव्हतीच; त्यात नवरा-बायकोंना एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण कमी झालं होतं, आणि म्हणून 'थोडे दिवस एकमेकांपासून ब्रेक घेऊन पाहूया', असा निर्णय दोघांनी घेतला होता. निदान तेव्हा तरी विभाला आरतीने हेच सांगितलं होतं. या थोड्या दिवसांच्या ब्रेकसाठी आरती घर शोधत होती, पण तिला घाईदेखील नव्हती. "राहता कुठेही येतं, जिच्याबरोबर राहणार ती व्यक्ती आवडली पाहिजे, आणि खरं सांगायचं तर मला तू आवडलीस" असं म्हणाली होती ती. फक्त दोन भेटींमध्ये 'मला तू आवडलीस' असं म्हणणाऱ्या आरतीचं विभाला तेव्हाही खूप नवल वाटलं होतं. पुढे मग दोघींच्या भेटी... गप्पा वाढतच गेल्या. विभाने रूममेट ठेवण्याचा निर्णय जवळजवळ रद्द केला होता पण आरतीसाठी घराचे दरवाजे कायम उघडे होते. अधूनमधून आरती, हक्काच्या घरी राहायला जातात तशी विभाकडे येऊन राहायची. कधी अख्खा दिवस, कधी फक्त एका संध्याकाळपुरती... तिच्याशी बोलून विभाला नेहमीच मोकळं वाटत असे. आयुष्यात नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे आलेल्या मानसिक ताणावर, हे आरतीचं येणं विभाला जणू एखाद्या मलमासारखं वाटत होतं.
आरतीच्या पहिल्या भेटीला साधारण ४-५ आठवडे लोटले असतील, तो एके दिवशी संध्याकाळी आरती मुसमुसतच विभाच्या घरी आली. घरी मोठं भांडण झालं असणार हे उघड होतं. सुरुवातीला आरती काही बोललीच नाही. विभासुद्धा काही न विचारता चहा करायला गेली. चहाचा कप समोर ठेवल्यावर आरतीने डोळे पुसले. "त्याला कळतच नाहीये... मी एकटी असते तशीही घरी. तो ऑफिसमध्ये असतो दिवसभर. रात्री तर वेगळेच झोपतोय सध्या आम्ही. मिळतोय की मग ब्रेक. पण म्हणजे थोडा वेळ घरी आल्यावर बोलायचं सुद्धा नाही का? मला खूप एकटं वाटतं... रविवारी तू तरी भेटू शकतेस.. पण बाकीचे दिवस तू सुद्धा busy असतेस. पूर्वी गाणी तरी गायचे.. आता कशातच उत्साह वाटेनासा झालाय. आजकाल नुसती झोपून राहते मी. उठून करू तरी काय? संसार दोघांचा असतो ना, पण जर त्याला काहीच नको असेल, तर मी तरी कशाला प्रयत्न करू?" आरतीने सगळं अक्षरश: ओकून टाकलं.
विभा आणि आरतीच्या गप्पा व्हायच्या, दोघीही आपापली मनं मोकळी करायच्या, पण आत्तापर्यंत बऱ्याचदा विभानेच तिची आयुष्याबद्दलची चिडचिड बोलून दाखवली होती. आरतीची भूमिका मुख्यतः ऐकून घेणारीची होती. 'स्वतःचं आयुष्य बोंबललेलं असताना दुसऱ्यांना कोणत्या हक्काने life-coaching करायचं...' हा विभाचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न असायचा. आणि त्यावर, 'Think of this period as a test for you' हे आरतीचं उत्तर असायचं. नकळतच आरती विभासाठी एक मोठा आधार बनली होती. त्यामुळे आजचं तिचं हे रूप पाहून विभा थोडी गोंधळली.
"थोडे दिवस इथेच राहातेयस का? माझेच कपडे वापर. पटकन खिचडी टाकते.. जेवूनच जा. चहासुद्धा गार झाला बघ..." विभा गडबडीतच म्हणाली. अशा प्रकारच्या तक्रारी आणि प्रश्न क्लिनिक मध्ये सोडवण्याची सवय होती तिला. पण स्वतःच्या जवळचं कोणीतरी माणूस ह्या अडचणीत सापडतं... तेव्हा.. नक्की काय करायचं...
"मला नकोय चहा. जाऊ दे. घरी बसून रडण्याचा कंटाळा आला म्हणून इथे येऊन बोलले.. इतकंच. मी निघते. वाटलं तर भेटेन पुन्हा. बाय." विभा काही बोलायच्या आत आरती घराबाहेर पडली होती. विभा जागच्या जागी थिजल्यासारखी उभी राहिली. ही काही बरंवाईट करणार नाही ना... फोन तरी... त्या दिवशी विभाच्या पहिल्यांदा लक्षात आलं... ह्या बाईचा आपल्याकडे फोन नंबरच नाहीये. सोशल मीडियावर चेक करायचं म्हणून विभाने फोन हातात घेतला.. आणि काही केल्या तिला आरतीचं आडनावच आठवेना... विभा त्या रात्री खूप बेचैन होऊन झोपली.
दुसऱ्या दिवशी आवरून विभा क्लीनिकमध्ये गेली खरी, पण आरती काही डोक्यातून जात नव्हती. रश्मी 'India trip'साठी रजेवर गेली होती. दिवसभराचे क्लायंट संपवून विभा घरी जाण्याची तयारी करायला लागली तो आरतीचा बाहेरून आवाज आला. "आहेस? वेळ आहे माझ्यासाठी?" विभा दचकलीच. "आहे. बरं झालं आलीस. ये. बस." विभा म्हणाली. आरती येऊन बसली.
"मला माहितेय तुझ्या क्लिनिकची वेळ संपलीय. पण माझ्यासाठी आता वेळ देशील?" आरतीला नक्की काय म्हणायचं होतं, विभाला कळलंच नाही.
"अगं, काहीही काय विचारतेस? घरीच चल. शांत बसून बॊलूया." विभा तिची बॅग उचलत म्हणाली.
"नाही. म्हणूनच इथे आल्ये. मला मदत हवीय तुझी. घरी आले की तू गोंधळून जातेस. काल तुझ्याशी बोलले तेव्हा वाटलं तू काहीतरी मदत करशील मला.. आधार देशील. पण तू सरळ बोलणंच टाळलंस. म्हणून इथे आले. You work as a life coach. Now be a life coach. To me. मूर्खपणा झालाय माझ्या आयुष्याचा." आरतीने त्राग्याने सगळं बोलून संपवलं.
विभा पुन्हा तिच्या खुर्चीवर बसली. त्या दिवसापासून आरती आणि विभाची sessions सुरु झाली. आरती दर शुक्रवारी विभाच्या क्लीनिकमध्ये यायची. वेळ मात्र तिने ठरवली होती.... ५ वाजून ५ मिनिटांची. विभासुद्धा तिच्या सेशनच्या आधीच सगळं आवरून ठेवत असे. म्हणजे दोघी मग एकत्रच घरी जायच्या. रश्मी सुट्टीवर असल्याने क्लिनिक बंद करायची घाईही नव्हतीच. क्लीनिकमध्ये मात्र आरती बऱ्याच विषयांवर मोकळेपणाने बोलत होती. संसारामधल्या अपयशाबद्दलची तिची खंत, एकटेपणाची आलेली भावना, छंद बाजूला सोडून दिल्यामुळे वाटत असणारा अपराधीपणा... ह्या सगळ्या गोष्टींवर विभा तिच्याशी चर्चा करायची. आरतीला मदत करताना विभाला ती स्वतःसुद्धा कुठेतरी सापडत होती.
गेले दोन शुक्रवार मात्र आरती आली नव्हती. रश्मी ट्रीपवरून परत आल्यापासून खरं तर आरतीचं येणं झालंच नव्हतं. त्यामुळे आज रश्मीनेच विषय काढला तेव्हा विभाला पुन्हा आरतीची काळजी वाटायला लागली. शेवटची भेटली, तेव्हा आरती तशी आनंदात होती. एक छान गाणंदेखील म्हणलं होतं तिने. आरती आनंदी दिसू लागली होती, छोट्या ट्रिप्स करून यायला लागली होती, गाण्याचा रियाझ करू लागली होती. तिला एकटेपणासुद्धा कमी जाणवू लागला होता... ती तसं म्हणाली देखील होती. पण पंधरा दिवस म्हणजे... बराच काळ झाला होता याला. विभाला थोडं बेचैन वाटू लागलं. ह्या सगळ्या विचारांच्याच तंद्रीत विभा घरी पोचली... तो drive-way वर आरती येऊन उभी होती. अस्ताव्यस्त कपडे, ओढलेला चेहरा, आणि पायात चपलाही नव्हत्या तिच्या. विभाला काही कळेना. विभाने घराचा दरवाजा उघडल्या क्षणी आरती सरळ आत जाऊन सोफ्यावर झोपली... विभाला काही विचारण्याची संधीही न देता.
त्या संध्याकाळी झोपलेली आरती जवळजवळ पुढचा अख्खा दिवस झोपूनच राहिली. विभाने बऱ्याचदा उठवायचा प्रयत्न करूनही तिला जाग आलीच नाही. तेव्हा मात्र विभाला शंका यायला लागली. हा प्रकार नक्कीच नॉर्मल नव्हता. विभाने मनातल्या मनात आरतीच्या सगळ्या लक्षणांची उजळणी केली. विभा डॉक्टर नसली तरी तिला मानसिक रोगांच्या लक्षणांची साधारण कल्पना होती. आणि अशा वेळी आपल्या क्लायंटला Life coach ची नाही तर psychiatrist ची गरज असते हेही तिला माहित होतं. विभाने तिच्या ओळखीच्या एका मानसोपचारतज्ज्ञाची भेट घ्यायचं ठरवलं. डॉ. पटेल तिच्या चांगल्याच ओळखीच्या होत्या. यापूर्वी दोघांच्या बाबतीत 'डिप्रेशन'ची तिला जेव्हा शंका आली, तेव्हा तिने डॉ. पटेलांनाच संपर्क केला होता. आताशा त्या दोघींमध्ये एक प्रोफेशनल मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. शिवाय शनिवारी इतर कुणाचीही अपॉइंटमेंट मिळणं तसंही शक्य नव्हतं. घाईघाईनेच विभाने फोन लावला.
"थोडी इमरजेंसी आहे. अगदी माझी फॅमिली मेंबर आहे हो... आज संध्याकाळची अपॉइंटमेंट मिळू शकेल? ५ वाजता चालेल?" विभा अगदी अजीजीच्या स्वरात विचारायला लागली.
"हे बघ विभा, this is extremely unusual. मी शनिवारी फक्त वेलनेस क्लासेस घेते. Why don't you come first thing on Monday? and call 911 if it's such an emergency. Get her admitted..." डॉ. पटेल म्हणाल्या.
"सॉरी डॉक्टर, खाजगी फेवर मागतेय. मी बाकी सगळी माहिती अगदी लगेच भरून देईन. तुम्ही भेटू शकलात तर खरंच खूप खूप बरं होईल. Technical issue असेल, तर आपण informally भेटू शकतो का?" विभा शक्य तितक्या नम्रपणे म्हणाली.
डॉ. पटेल विचारात पडल्या. विभाकडून अशा प्रकारचा फोन पहिल्यांदाच आला होता. इतर कोणी हे विचारलं असतं, तर 'unprofessional' म्हणून डॉ. पटेलांनी सरळ धुडकावून लावलं असतं... पण विभाचा आजचा आवाज काही वेगळाच होता. "All right विभा... Just for your sake.. let's just have a chat today. तसाही तुझ्या हातचा चहा घेऊन बरेच दिवस झालेत.. Let me just wrap up here and I will be there, at your house in about an hour?" डॉ. पटेल म्हणाल्या.
आरती अजूनही झोपलीच होती. तिला उठवून सांगावं असं काही विभाला वाटलं नाही. उठून तरातरा निघून गेली असती तर पुन्हा पंचाईत. डॉक्टर घरी यायच्या वेळीच तिला उठवावं असा विचार करून विभा घर आवरायला लागली. तास पटकन निघून गेला आणि डॉ. पटेलांनी 'almost there' चा मेसेज केला. विभा आरतीच्या जवळ गेली, तिला उठवायला. बराच वेळ प्रयत्न केल्यावर आरतीने डोळे उघडले. तिला थोडी कल्पना देणार इतक्यात दरवाज्याची बेल वाजली, आणि विभाने दरवाजा उघडला.
"हाय डॉ. पटेल, या ना. थँक्स अ लॉट हं... आणि अगदी खरंच सॉरी.. पण..."
"कोण आहे ग?" आरतीचा प्रश्न आला.
"या ना डॉक्टर, This is Aarti. हिच्याबद्दलच तुम्हाला बोलत होते. माझी क्लायंट आहे खरी पण त्याहीपेक्षा चांगली मैत्रीण आहे. She has been feeling low a bit lately, if you get what I mean..." विभा भराभर बोलायला लागली... आरतीला अजिबात बोलायची संधी न देता.
डॉक्टर पटेल सुरुवातीला थोड्याशा भांबावल्या, पण विभाचा एकूण आवेग बघून गोष्टी त्यांच्या लक्षात यायला लागल्या. त्यांनी विभाला बसून घ्यायला सांगितलं. थोडं हसून त्यांनी विभाशी बोलायला सुरुवात केली. "विभा, तुला थोडे प्रश्न विचारू? अगदी गप्पा मारूया साध्या. थोडं आरतीबद्दल सांगशील मला?" विभाला थोडं आश्चर्य वाटलं, पण तिने बोलावलं होतं डॉक्टरांना... विभाने सगळी माहिती.. अथपासून इतिपर्यंत सांगितली. पुढचे प्रश्न मात्र थोडे विचित्र आले.
"विभा, आरतीबद्दलचे थोडे खाजगी प्रश्न विचारते. आरती सकाळपासून काही जेवलीय का ग? Rather... what's her favorite food? How about drink? चहा कि कॉफी? आणि तुला भेटायला येते कशी? Car.. public transport? Does she live close-by?" डॉक्टरनी विचारलं. विभा विचार करायला लागली. आरतीने आज काही खाल्लं नव्हतं. झोपूनच होती ती... पण यापूर्वीही कधी ती काही खायची किंवा प्यायची नाही विभाकडे. कितीही तास बसली तरी तिने कधी पाणीसुद्धा घेतलं नव्हतं. तिचं येणं-जाणं... नेहमी अचानकच असायचं... किंवा तिच्या सोयीनं. सेशन्सची वेळसुद्धा तिनेच ठरवली होती. विभा स्वतःहून कधीच संपर्क करू शकली नव्हती तिला. आणि आत्ताच्या ह्या प्रश्नांना ती स्वतःहून उत्तरं... का? विभाला आता भीती वाटू लागली. डॉ. पटेल विभाच्या शेजारी येऊन बसल्या. विभाला शांत करायची जबाबदारी त्यांचीच होती.
"विभा, मला वाटतंय तुला कळतंय मी काय सांगणार आहे ते. तुझ्या शेजारी आरती बसली नाहीय. का? कशामुळे? याबद्दल आपण नक्की बोलूया. But I want you to come to my office, first thing in the morning. Let's work on this as soon as possible. Again, you have to be calm. मी आता निघतेय. शक्य असेल तर रश्मीला आज घरी बोलावून घे. शांत राहा. Take care." डॉ. पटेल निघून गेल्या. विभाला गळून गेल्यासारखं वाटलं. आरती अजूनही सोफ्यावर बसलेली होती. जिच्या आधारावर विभाला ती स्वतः पुन्हा सापडली होती, तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय आता विभाला घ्यायचा होता. निःशब्दपणे विभाने फोन उचलला... मागून आरतीच्या गाण्याचा आवाज आला...
"घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात; माहेरी जा, सुवासाची कर बरसात..."

- समृद्धी

Saturday, February 16, 2019

नक्षी


कागद आणि कात्रीचा वाद झाला एकदा.
कात्री खूप चिडली... तुला कापून काढीन म्हणाली...
कागद दुखावला. घडी करून बसला.
कात्री अजूनच कावली. कागदाला कराकरा चावली. शेवटी स्वतःच दमली. बाजूला जाऊन बसली.
कागद मग उघडला. कात्रीजवळ गेला...
आणि म्हणाला, "नक्षीबद्दल धन्यवाद!"

-समृद्धी 

Wednesday, January 16, 2019

नातं

"Sorry Ms. Neha, we will have to postpone the meeting by an hour or so... the previous family had some issues, so we are dealing with it right now.You won't mind waiting for some time, would you?"
"yes, I do mind.... but fine... I don't have a choice, do I?" नेहा थोड्या नाराजीने म्हणाली.
"We very much appreciate it... we will try to start as soon as possible.."  दिव्या उत्तरली.
"I will wait in the room. we can just meet here when you are ready." नेहा रोहितच्या बेडकडे वळली.
सकाळपासूनच नेहाची खूप चिडचिड झाली होती. कालच हॉस्पिटल मधून case managerचा फोन आला होता. दोन महिने होऊन गेले होते गेल्या मीटिंगला. आता पुन्हा मीटिंग ठरली होती... रोहितसंबंधी डिसिजन घेण्यासाठी. ६ महिन्यांपूर्वी ऑफिसमधून घरी येताना freeway वर गाडी चालवताना अचानक रोहितला heart attack आला. गाडी गोल फिरली... नशिबानेच fracture वगैरे झालं नाही, पण डोक्याला मार लागला. रोहित unresponsive होता. जवळजवळ ३० मिनिटं CPR दिल्यानंतर पॅरामेडिक यशस्वी झाले. मेंदूला रक्तपुरवठा न झाल्याने रोहितच्या बऱ्याच शरीरप्रक्रिया बंद पडल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर रोहितवर बऱ्याच सर्जेरीज कराव्या लागल्या. घशातून ट्यूब घालून (Tracheostomy), Ventilatorवर त्याचा श्वास चालू होता,  दुसऱ्या ट्यूबमधून अन्नपुरवठा सुरु होता. रोहितची बायको आणि फाईलवरची  responsible party/spouse  म्हणून नेहाचं नाव असल्याने तिलाच सगळं ठरवावं लागत होतं. हॉस्पिटलच्या फेऱ्या तिच्यासाठी आता रूटीनचा भाग झाल्या होत्या.... नको असलेल्या रूटीनचा.
ऑफिसमधलं presentation पुढे ढकलायला लागलं होतं... आता पुन्हा सगळ्यांच्या वेळा जमवून... पुन्हा सगळं manage करायचं म्हणजे एक डोक्याला ताप होता. पण हॉस्पिटल वाल्यांना काय पडलंय त्याचं.... आणि आता पुन्हा "you won't mind waiting..." हे वर. लॅपटॉप उघडून नेहा wifi ला कनेक्ट झाली, एकीकडे emails ओपन करून, दुसरीकडे तिने तिचं गाण्यांची playlist सुरु केली; आणि earphones लावले.
"हीरन.... समझ... बूझ... बन... चर...ना...... ही.... रन...."
आहा... नेहा थोडी शांत झाली. कुमार गंधर्व.... काय जादू आहे ह्या माणसाच्या आवाजात... काळजाला हात घालतात... रोहितला कुमारांची निर्गुणी भजनंच जास्त आवडायची. नेहाला मात्र सगळंच खूप भारी वाटायचं...
नेहा आणि रोहित तसे अपघातानेच भेटले एकमेकांना. एका गाण्याच्या कार्यक्रमात. मग ओळखीचं रूपांतर आधी मैत्रीत झालं, आणि ३-४ महिन्यांतच रोहितने नेहाला लग्नाची मागणी घातली. नेहा नुकतीच graduate झाली होती... पुढच्या शिक्षणाबद्दल अजून विचार व्हायचा होता. रोहित नोकरीनिमित्त अमेरिकेत जाण्याच्या तयारीत होता. घरच्यांना दोघांच्या वयातलं ७ वर्षांचं अंतर थोडं खुपलं, पण स्थळ चांगलं आहे, आणि मुलांनीच एकमेकांना पसंत केलाय तर आपण कोण अडवणारे... असा विचार करून, घरच्यांनी दोघांचं लग्न लावून दिलं.
"मेंदीच्या पानावर... मन अजून... झुलते गं..."
अमेरिकेत आल्यापासूनची पहिली दोन वर्षं Extended honeymoon सारखी गेली. शिक्षण, नोकरी, व्हिसा...मुलांची फार घाई नव्हतीच... नेहा अजून तिशीचीसुद्धा नव्हती... मग आईबाबांच्या परदेशवाऱ्या... या सगळ्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. दोघेही स्थिरावले... आपापल्या आयुष्यात... एकमेकांच्या मनात. आता वेळ मिळायला लागला होता.... एकमेकांबरोबर... एकमेकांशिवाय...  स्वभावाचे कंगोरे आता खरे कळायला लागले... आवडीनिवडी लक्षात राहायला लागल्या.. खटकायलाही लागल्या.
"अब कोई आस ना उम्मीद बची हो... जैसे... तेरी फ़रियाद मगर..."
जुनं version आवडतंच... पण नवीनसुद्धा छान झालंय... नेहा मनाशीच म्हणाली.
रोहितच्या आयुष्याबद्दल काही ठराविक कल्पना होत्या. प्रत्येक निर्णय पुढे नेणारा हवा होता त्याला. लग्न, नोकरी, कार,  घर, अजून चांगली नोकरी.. अजून चांगलं घर... अजून चांगली कार... अजून चांगली.... ह्यात नेहाला मात्र तिचे आडाखे बांधता येईनासे झाले. 'चाललंय ते छान आहे की....' ह्या नेहाच्या सुरुवातीला मजेशीर पण त्याच्या महत्त्वाकांक्षेला फारसा अडथळा न आणणाऱ्या भूमिकेचा आता रोहितला उद्वेग यायला लागला. सुरुवातीला 'Balanced' वाटणारी नेहा आता उदासीन वाटायला लागली.... बेडरूममध्ये संपणारी भांडणं आणि अबोला आता तसाच भिजत पडायला लागला... 'उगाच चिडतोय... डोकं शांत झालं की होईल सगळं ठीक' ह्यावर नेहा प्रत्येक वादाची सांगता करू लागली....आणि 'निदान भांडणात तरी initiative दाखव' ह्यापाशी रोहित येऊन पोचला.
"खर्रर्रर्रर्र..... गर्रर्रर्रर्रर्रर्र..."
नेहा तंद्रीतून जागी झाली. रोहितचा श्वास अडकला होता. थुंकी आणि इतर secretions रोहितच्या घशात आणि तोंडात जमा झाली होती... suctionची गरज होती. नेहाने call light दाबला, आणि ती रेस्पिरेटरी थेरपिस्टला आणायला बाहेर गेली. नॅन्सी धावत आली, तिने trachच्या ट्यूबमधून नळी आत खुपसली आणि suction pump सुरु केला. दोन मिनिटांत श्वास पूर्ववत झाला. नॅन्सी सगळ्या गोष्टी पुन्हा जागेवर ठेवून निघून गेली.
"We are ready for you... if you are... Ms. Neha...?!" दिव्याच्या आवाजाने नेहा पुन्हा भानावर आली.
"Oh... sure, yes..."
डॉक्टर, नर्स, थेरपिस्ट सगळे रोहितच्या रूममध्ये आले. रोहितच्या advanced directive वर 'Full code' लिहिलं होतं. सगळ्यांच्या मते रोहितची गेल्या काही महिन्यातली अवस्था बघता, त्याच्याबद्दल काहीतरी निर्णय घेणं आवश्यक होतं. नेहाला मात्र सगळ्याची उगाच घाई होतेय असं वाटत होतं. रोहित चाळिशीचासुद्धा नव्हता.
"Ma'am... please... At this time, he has undergone multiple surgeries; and each recovery has been worse than before. His joints are getting stiff, he needs suction more frequently, he is at high risk for skin breakdown. Every new event causes more swelling in his brain and in turn more damage."
"I understand. But can't we just keep going with current interventions? He is covered... there is no financial issue. Why can't we just let it happen naturally?" नेहा उत्तरली.
"Ma'am.. he is not responding favorably. His condition is only going to get worse. We highly recommend Hospice and palliative care. We have someone from Hospice to give you an idea. Please let us know whatever you decide." दिव्याने आटोपतं घेतलं. नेहाने मानेनेच "ठीक आहे" सांगितलं.
"Hi, I am Leah." Hospice ची pamphlets घेऊन एक नवीन बाई नेहासमोर आली.
"I can imagine how exhausting this must be for you.. but you see, ma'am... for patients like this.... they are so dependent in this condition. We have to also think about their dignity. I understand, it can be really hard to think this way about someone you love...."
नेहा थबकली.... "लव्ह?!!" भारत सोडून इथे आली नेहा.. तेव्हा पडली होती कदाचित प्रेमात... रोहितच्या... घडणाऱ्या घटनांच्या. पण आता... हे सगळं होण्याआधी काही महिने रोहितने नेहाकडे घटस्फोट मागितला होता. त्यांचं पटत नव्हतं... कारणं होतीच असंही नाही. दोघांमध्ये संवाद होतच नव्हता. रोहितला सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा होता; आणि नेहाला काहीही उकरून काढायचं नव्हतं... किंबहुना... वाद होईल अशा कोणत्याच ठिकाणी तिला जायचंच नव्हतं. आपल्यामुळे घरच्यांना घोर नको म्हणून दोघांनी आपापल्या आईवडलांना थोडं दूरच ठेवलं होतं. त्यामुळे मध्यस्थीसुद्धा होत नव्हती.  सहजीवनाची व्याख्या म्हणजे रूममेट्स सारखं एका घरात राहणं, अशी झाली होती. दोघांमधलं नवराबायकोचं नातं कोरडं झालं होतं. High risk of breakdown...
"At this time, ma'am... we have to focus on making him comfortable. He is really stuck... in this condition."
नेहा भानावर आली. दिव्याचे शब्द तिला आठवले. रोहितचा अडकलेला श्वास आठवला. नातं सुद्धा अडकलंच होतं कि त्यांच्यातलं... marriage counseling बद्दल रोहितने विचारलं होतं... पण आपल्यातल्या गोष्टी 'naturally' काळानुसार बऱ्या होतील... ह्यावर नेहा कायम होती... करायला हवं होतं कदाचित... सगळ्या गोष्टी तशाच साचून राहिल्या... बोलून मोकळं व्हायला हवं होतं कदाचित... कदाचित suction ची गरज होती. कदाचित सगळ्या गोष्टी 'naturally' सुटत नाहीत... साचलेल्या पाण्याला निचरा करून द्यायला लागतो... रोहितच्या घशातल्या secretions साठी नॅन्सीला suction करावं लागलं.... He is stuck... his life is stuck...
"I am changing the directive to DNR/DNI. Can we talk about hospice tomorrow? I am a bit tired." नेहाने मोठ्ठा श्वास घेतला.
"Sure ma'am, signature please... we will leave you to it... Thanks." गर्दी निघून गेली.
नेहाने रोहितकडे डोळे भरून बघितलं... बऱ्याच दिवसांनी... मनात खळबळ माजली होती. आज दिवसभर ती इथेच बसणार होती. छातीत का कोण जाणे धडधड होत होती... नेहाने इअरफोन्स पुन्हा कानाला लावले...
"उड जायेगा... हंस अकेला...."
नेहा शांत झाली.

-समृद्धी