Sunday, October 21, 2012

शमिकाची आई

परवा शमिकाची आई भेटली आणि मनात असलेल्या सुप्त जाणीवा जाग्या झाल्या. विचारांची उजळणी सुरु झाली.

जवळजवळ अडीच वर्षं झाली. Institute for children with mental handicap मधली नोकरी मी सोडली आणि एका private clinic मध्ये लहान मुलांबरोबर काम करू लागले. नोकरी सोडली, पण तरीही Institute मधल्या पोरांशी असलेले बंध तुटले नाहीत. तिथे काम करणा-या माझ्या सहका-यांकडून मला त्यांची खबरबात कळतच होती.
मग एके गुरूवारी दुपारी मानसीचा... माझ्याबरोबर पूर्वी Institute मध्ये काम करणा-या special educatorचा फोन आला. "समृद्धी ... वाईट बातमी... शमिका आज गेली..." एक क्षण सुन्न झाले... थोडे डोळे ओलावले... आणि मग मनात विचार आला... शमिकाची आई... सुटली... मग वाटलं... हा कसला विचार... क्रूर विचार... पण मग समजावलं... खरंच ना ते...

शमिका... माझ्याकडे आली तेव्हा तीन वर्षांची होती. Cerebral palsy, progressive muscular disease आणि severely mentally retarded. बोलायची काहीच नाही. सगळं खायची... पण भरवायला लागायचं. तिचा definitive म्हणता येईल असा कोणताच diagnosis झाला नव्हता. वेगवेगळ्या डॉक्टरकडे जाऊन झालं. २०-२५ टेस्ट्स करून झाल्या होत्या.... शेवटी पैसे फार खर्चं होत होते म्हणून आणि डॉक्टरांच्या सांगण्यावरून diagnosis चा हट्ट तिच्या आई्बाबांनी सोडून दिला. शमिकाची आई... मी बघितलेली एक धीराची बाई. प्रसन्न.... हसतमुख. शमिकाच्या therapyमध्ये पूर्ण सहभाग असलेली. शमिकाच्या आईनी तिच्या उपचारांसाठी स्वत:ला वाहून घेतलं होतं. त्यांच्या उत्साहाचं आणि प्रयत्नांचं मला मनापासून कौतुक वाटंत असे.

वयाच्या ६व्या महिन्यापासून शमिका therapy घेत होती. तसं बघता फार काही चांगली प्रगती नव्हती तिची. वय वाढत होतं तशी ती शरीराने वाढत होती. जड होत होती. चालता येत नसल्याने तिची आईच तिला उचलत असे. विरारपासून पार्ल्याला आठवड्यातले तीन दिवस त्या घेऊन येत असत. शमिका गोड होती पण लाडावलेली होती. एक नवीन practitioner असल्याने मी progress oriented होते. "तुमच्या लाडांमुळे ती बिघडली आहे... हट्टी झाली आहे..." मी शमिकाच्या आईला ओरडत असे. तीन वर्षांची मुलगी... पण तिचा स्वभाव मात्र विकसित झाला होता. जवळजवळ सहा-सात महिन्यांनंतर  शमिका हात धरून उभी राहायला लागली, आणि शमिकाच्या आईला strict होण्याचं महत्त्व पटलं. मग अचानक शमिकाला ताप आला, फिट आली आणि ती पुन्हा लोळागोळा झाली. माझी थोडी निराशा झाली... पण शमिकाची आई खचली नव्हती. पुन्हा नव्याने आमची therapy सुरू झाली.

एके दिवशी शमिकाची आई clinic मध्ये cake घेऊन आली. "आज वाढदिवस?" मी विचारलं. "हो... शंतनूचा..." "कोण?"... "शमिकाचा मोठा भाऊ..." "तुम्हाला दुसरा मुलगा असल्याचं कधी बोलला नाहीत..." "शमिका व्हायच्या दोन वर्षं आधी गेला तो." "गेला?... कशामुळे?" "हिच्यासारखाच होता... पण तो बोलायचा थोडं थोडं... पाच वर्षांचा होऊन गेला... ताप आला... फीट आली... आणि गेला... त्यामुळे Madam हिला फीट आली ना... की धस्सं होतं. इथेच आणायचे त्यालासुद्धा...Madam, तुम्ही म्हणता ना, हिला कसं काय घेऊन येता... तो तर हिच्यापेक्षाही जड होता... आणि लांबसुद्धा. तेव्हा Madam लक्षात नाही आलं.. पण मग ही झाली तेव्हा Doctor म्हणाले check करूया. मग कळलं... ह्या दोघांचा आजार genetic आहे... आमच्यात काहीतरी गडबड आहे. म्हणून आता पुढे chance नाही घ्यायचा ठरवलंय... विचार करतोय दत्तक घेण्याचा... शमिकावर माया आहे हो आमची... तीसुद्धा भारी जीव लावते पण तरीही...Madam वाटतंच ना... एक normal मूल असावं... शंतनूला जाऊन आता पाच वर्षं झालीत. तर आता ठरवतोय... ह्या शुक्रवारी जाणार आहोत. विचारपूस करू. हिलाही कोणीतरी घरी खेळायला होईल..." चांगला निर्णय आहे तुमचा... all the best!" मी म्हणाले.

पुढच्या आठवड्यात therapyला आल्या तेव्हा मी पुन्हा शमिकाच्या आई्ला विचारलं, "काय झालं मग?" "जाऊ द्या ना Madam... तो दिवसच चांगला नव्हता." "का... काय झालं...?" "तिकडे गेलो तेव्हा आम्ही आत आल्याबरोबरच शमिकाला बघून म्हणाले... ही एकच तुम्हाला?... म्हणे...mentally retarded ना? मग दत्तक नाही देऊ शकणार...म्हणे तुम्ही तुमच्या मुलीची काळजी घ्यायला म्हणून दत्तक घेत नाही कशावरून?... म्हणे काय guarantee, की तुम्ही दत्तक मुलाला caregiver म्हणून वापरणार नाही?... ही अशी भाषा? Madam असला राग आला... तडक निघून आलो... गाडीत बसलो... विरार फास्ट. विकलांगचा डबा फुल्ल होता म्हणून general मध्ये गेलो. एका गृहस्थांनी शमिकाला बघून बसायला जागा दिली तर समोरची बाई म्हणते... एवढ्या गर्दीच्या वेळी अशा मुलांना कशाला आणतात कोण जाणे? ... म्हणे अशी मुलं म्हणजे गेल्या जन्मीच्या कर्मांची फळं.... असं बोलतात Madam? एवढे कसे हो क्रूर हे लोक?"

मीही चाट झाले हा अनुभव ऐकून. घरी येऊन आईला सांगितला हा अनुभव आणि बोलण्याच्या ओघात म्हणाले... "आई... अगं इतक्या चांगल्या आहेत ना त्या... पण शमिकामुळे त्यांना दत्तक मूल नाकारलं..."
'शमिकामुळे?'....

एक थेरपिस्ट म्हणून मला आधीच कळलं होतं की शमिकात फार काही प्रगती होणार नाही. पण तरीही ती अशी पट्कन exit घेईल याची अपेक्षा नव्हती. शमिका गेली तेव्हा वाईट वाटलं... तिच्या आईसाठी... पण थोडसं बरंही वाटलं... आता त्यांना दत्तक मूल घेणं शक्य होईल.

काही महिन्यांनी पुढची बातमी कळली. शमिकाच्या जाण्यानंतर तिच्या वाढदिवसाला त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. चांगलं झालं... मी मनात म्हटलं.... आणि परवा अचानक शमिकाची आई भेटली. रस्त्यावरून जात असताना. "Madam.... ओळखलंत का?" "अरे... कशा आहात? काय म्हणताय?" "मजेत.... मिस्टर तृप्तीला घेऊन पुढे गेलेत." "तृप्ती?" "आमची मुलगी..." "ओह... congrats! मला कळलं होतं तुम्ही दत्तक घेतलीत ते... किती वर्षांची आहे?" "आत्ता तीन पूर्ण करेल. हसरी आहे... खूप बडबड करते... केजीत घातलंय... चालू असतं रोज घरी... स्वत:शीच गाणी काय म्हणते... खेळते... मजा आहे नुसती..." "वा! झकास! एकदम खूष दिसताय... " "चहा घ्यायचा Madam? मी यांना फोन करून पुढे व्हायला सांगते..." "ओके. मला आत्ता वेळ आहे... पण फक्‍त अर्धा तास. " शमिकाची आई हसली. छान वाटलं.

आम्ही चहा मागवला आणि गप्पा सुरू झाल्या. शमिकाची आई... खरं तर आता तृप्तीची आई... तिचं कौतुक सांगत होत्या. मग म्हणाल्या," Madam, पुढच्या आठवड्यात शमिकाचा वाढदिवस आहे... येणार?" "विरारला?" "नाही... आम्ही आता ठाण्याला गेलोय. यांनी नोकरी बदलली. तुम्हाला जवळ पडेल." " बघू. पण तुम्ही अजूनही शमिकाचा वाढदिवस साजरा करता?" "Madam तृप्तीलाही त्याच दिवशी दत्तक घेतलं ना... त्याच अनाथाश्रमातून घेतलं Madam.... संचालकांना म्हटलं, त्या वेळी आम्ही 'आमची' मुलगी दत्तक घ्यायला आलो होतो... आजही 'आमची' मुलगीच घ्यायला आलो आहोत. फक्‍त त्या वेळेला ती दुसरी मुलगी होती, आत्ता एकुलती एक असणार आहे. गप्प बसले. Sorry म्हणाले. म्हणे Madam, तुम्ही चांगली माणसं आहात... पण आमच्यावर जबाबदारी असते. आम्ही वाईट केसेस पाहिल्या आहेत." "मग? शंतनू-शमिकाची आठवण आता येत नसेल ना एवढी?" "हं... खूप आठवण येते Madam. कधीकधी तृप्ती झोपली ना... की रडायलाही येतं..." "का? अहो इतकी छान मुलगी आहे की तुम्हाला..." "तसं नाही Madam... शंतनूला जाऊन आता बरीच वर्षं झाली... पण शमिका... शंतनू हट्टी नव्हता  Madam... तो बोलायचा आणि हातावरती ढकलत घरभर फिरायचादेखील. तो माझ्याशिवाय राहू शके. तो माझ्यापासून वेगळा झाला होता. पण शमिका माझ्यापासून वेगळी झालीच नाही Madam. ती हट्टी होती... हातपाय झटकायची... लाथा मारायची... पण तिच्या गरजा... तिचं बोलणं.. सांगणं... फक्‍त मला जाणवायचं. तिला काय हवं नको ते तिच्या नजरेतून मला कळायचं. आणि माझा वेडेपणा असेल कदाचित... पण माझं बोलणं तिला समजायचं Madam... चारचौघांसारखी ती मला उत्तरं देत नसेल कदाचित पण खूष झाली की ती मला बिलगायची... पापे घ्यायची... आणि गोड हसायची. Madam मी खूप खूष आहे. आमची तृप्ती फार गोड आहे. आमच्या family मध्ये सगळ्यांची आवडती आहे. पण शमिका फक्‍त माझी होती. खरं तर ती माझ्याशिवाय कोणाचीच नव्हती. तिला जेवढी माझी गरज होती ना... तेवढीच मलाही तिची गरज होती. आपण तिचा आधार आहोत... आपल्याशिवाय तिचं कोणीच नाही ही जाणीव वेगळीच असते Madam. आजही कधीकधी स्वप्नात येते... पाठीवरून हात फिरवते... तिला लक्षात येतं... तिच्या आईची पाठ तिला उचलून दुखत असे.... काय Madam... अर्धा तास झालासुद्धा... निघायला हवं... उद्याची तयारीही करायची आहे. तुम्ही याच Madam शमिकाच्या वाढदिवसाला... मजा येईल...छान वाट्लं आज तुमच्याशी बोलून..."

त्या माझा निरोप घेऊन निघून गेल्या. मी पहात राहिले... दुस-या दिवशीची तयारी करण्यासाठी, चार पिशव्या सांभाळत झपाझप जाणा-या 'तृप्तीच्या आई'त मला मात्र अजूनही शमिकाला कडेवर उचललेली, एका बाजूला कमरेत वाकून चालणारी 'शमिकाची आई'च दिसत होती. प्रसन्न... हसतमुख.

- Samruddhi












2 comments:

  1. touching....
    kahi thikani typesetting nit karne garajeche ahe.


    Best !
    Vishal

    ReplyDelete
  2. I tried. Some problem with long drafts may be... Thanks though.

    ReplyDelete