Tuesday, June 25, 2013

राग'स्व'भाव

मी गर्भात असताना आईने संगीत विशारद पूर्ण केलं. शास्त्रीय संगीताचा वारसा तेव्हापासूनच मिळाला. पुढे जशी बोलायला लागले, तशी आईने स्वरांशी मैत्री जोडून दिली ती कायमची. गाण्याची समज जशी वाढत गेली, तसे राग जणू डोळ्यासमोर उभे राहू लागले. माझ्या मनावर पडलेली या रागांची काही प्रतिबिंबं आज... इथे...

भूप... मी शिकलेला पहिला राग.
'ग प ध सां..... ध ग ध प ग रे.... ग रे गरेसाध... धरे.... सा.'
भूप मला सरळमार्गी वाटतो. पाच शुद्ध स्वर. सा, रे, ग, प, आणि ध. म आणि नी वर्ज्य. भूप शांत आहे. मला भूप एखाद्या राजयोग्यासारखा वाटतो. द्रुढनिश्चयी, करारी, सद्वर्तनी, न्यायप्रिय. एकाच वेळी भौतिक सुखात राहूनही, अंतरात विरक्‍त असणारा. संगीतात भूप भावपूर्णही आहे. 'सुजन कसा मन...'मधे भूप लडिवाळ... पित्यासारखा भासतो... 'इन आंखोकी मस्ती....' मधे त्याच्यातली कलासक्‍ती दिसते तशीच विरक्‍तीही जाणवते. हा राजयोगी विरहदशेत गेल्यावर 'दिल हूमहूम करे...'च रूपही घेतो. आणि जीवनाची क्षणभंगूरता जाणवून 'महकता हूं... बहकता हूं.... चहकता हूं' होतो.
पण तरीही भूप पूर्णपुरूष नाही. स्वत:ला झोकून देऊन जीवन उपभोगण्याची त्याची व्रुत्ती नाही. भूप कल्याण थाटाचा. खरं तर कल्याण थाटाचं वैशिष्ट्य म्हणजे तीव्र मध्यमाची उपस्थिती. पण भू्पमध्ये 'म'च नाही. संगीततज्ज्ञांनुसार भूपमधला हा वर्ज्य मध्यम, तीव्र आहे. भूप गाताना, मांडताना हा तीव्र मध्यम त्याच्या अनुपस्थितीची सतत जाणीव करत राहतो. आणि म्हणूनच भूपच्या व्यक्‍तीमत्त्वात त्याची छटा उमटते.  झोकून देऊन जीवन उपभोगण्याची व्रुत्ती हाच तीव्र मध्यम दर्शवतो. ती आसक्‍ती आणि निषादामधले सर्व आर्त भाव घेऊन एक पूर्ण पुरुष प्रकटतो... तो म्हणजे... यमन.

'नी रे ग मा रे गमाप.... मा ग.... ग मा ध नी सां....'
राजयोगी भूप जणू या यमनला दीक्षा देतो. यमन शांत आहे. धीरगंभीर आहे. आनंदी आहे, पण स्वच्छंदीही आहे. यमन जीवनाचा पुरेपूर आस्वाद घेतो. यमनमधला गंधार स्थैर्य देतो. तीव्र मध्यम उपभोगी व्रुत्ती देतो, निषाद ओढ दर्शवतो तर षड्ज पूर्णत्वाचा प्रत्यय आणून देतो. 'नाथ हा माझा'मधे यमनही लाजतो, लडिवाळ होतो. 'निगाहे मिलाने को जी चाहता है' म्हणत वेडं प्रेम करतो. 'जा रे बदरा बैरी जा' म्हणत त्याच्यातली चंचलता दाखवतो. 'चंदन सा बदन' मधून पवित्र, शांत भाव दर्शवतो; 'छुपा लो यूं दिल में प्यार मेरा, जैसे मंदिर में लौ दिये की' म्हणत त्यागव्रुत्ती  प्रकट करतो. तसंच 'आंसूभरी हैं ये जीवन की राहें' म्हणत दु:खही विरक्‍तपणे भोगतो. आयुष्यातली सर्व सुखदु:खं, भावना यमन पूर्णत्वाने पेश करतो.

काही जीव मात्र अपूर्णत्वाची आस लावून असतात. विरहात झोकून देण्याची त्याची व्रुत्ती असते. बागेश्री आणि अभोगी या अशा बहिणी मला वाटतात. राधा आणि मीरासारख्या. 

' म ध नी सां नी ध... म प ध म रे सा'
बागेश्री प्रथम आयुष्यात आला, तेव्हा फार कंटाळवाणा वाटला. अडनिड्या वयात बागेश्री उमजायला लागला, आणि प्रेमात पडल्यावर बागेश्री आपला वाटू लागला. 'हमसे आया ना गया, तुमसे बुलाया ना गया' चं प्रेम... थोडसं बुजरं, थोडसं अव्यक्‍त बागेश्री ओतप्रोत सामावून आहे. विरहातली व्याकुळता बागेश्री पूर्णत: दाखवतो. 'जाग दर्दे इश्क़ जाग... दिल को बेकरार कर' म्हणत आसूओं का राग' हे बिरूद बागेश्री सार्थपणे मिरवतो. 'भवतार तू हा कान्हा, वेगी भेटवा का...' अशी विरहिणी म्हणून बागेश्री पुरेपूर शोभतो.

अभोगी खरंतर बागेश्रीसारखाच. पण जो फरक मीरा आणि राधेत तोच मला अभोगीत आणि बागेश्रीत वाटला.  राधा विरहिणीच पण तिने प्रेमाचा जवळून आस्वाद घेतला. प्रेम अनुभवून राधा त्या प्रेमाची आस लावून बसली. मीरा प्रेमाचा ध्यास घेऊन बसते. तिला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. अभोगीही असाच अपूर्णत्वाचा ध्यास लावतो. 

'म ध सां ध म रे रे ध ध सा...' 
वर्ज्य असलेले नी आणि प, अभोगीतली अपूर्णता पोहोचवतात. 'दवात भिजल्या जुईपरी ते मन हळवे झाले' म्हणत अभोगी सैरभैर करतो. बागेश्री व्याकुळ करतो, अभोगी चुटपुट लावत राहतो. काहीतरी हातून सुटलंय... काहीतरी कधी मिळणारंच नाही का असे प्रश्न अभोगी निर्माण करतो आणि त्यातच संपून जातो. मीही अभोगीत अशीच रमते... शेकडो रागांत गुंगून जाते आणि माझ्या मनावर उमटणा-या त्यांच्या प्रतिबिंबांत मिसळून जाते. 

- समृद्धी 

1 comment: