Tuesday, December 25, 2018

स्टॅंडर्ड

"तिघांना एवढं पुरेल ना रे?" मी ऑर्डर करताना विचारलं.
"आपल्याला बास होईल, वाटलं तर अजून मागवू ", निखिल म्हणाला.
थाई रेस्टॉरंट मध्ये आम्ही एक नूडल्स आणि एक करी अशी ऑर्डर दिली. खाणारे तीन म्हणजे मी, तो आणि आमची तीन वर्षांची मुलगी. साधारण १५ मिनिटांत जेवण आलं.
 "जरा कमीच आहे ना रे?", मी.
"खाऊन मग ठरवू." इती निखिल.
आम्ही जेवायला सुरुवात केली, आणि समोर आलेल्या डिशेस संपवता संपवता आमचं पोट भरलंसुद्धा!
"इथली quantity खरं तर अमेरिकन standard प्रमाणे नाहीए. भारताच्या standard प्रमाणे आहे. चांगलंय." निखील म्हणाला.
अमेरिकन स्टॅंडर्ड... खरंच... आठ वर्षांपूर्वी इथे आले, तेव्हा असलेलं स्टँडर्ड्सचं perception किती बदललंय आता माझंच... याची जाणीव झाली.
२०१० साली लॉस अँजेल्स च्या विमानतळावर उतरले तेव्हा बाहेर आल्यावर आधी सगळं नवी मुंबई सारखं  दिसतंय असं वाटलं होतं मला. मग हळू हळू हवेतला कोरडेपणा जाणवायला लागला, आणि त्यानंतर लोकांचा बोलताना जाणवणारा नको तेवढा लडिवाळपणा बोचायला लागला. अनोळखी लोक कधीही येता जाता सरळ नाव वगैरे सुद्धा न विचारता १५-२० मिनिटं सहज बोलून जाऊ शकतात, नुकतीच ओळख झालेली माणसं चक्क मिठ्या मारून मग "hi, how are you" वगैरे म्हणतात,  पण कोणाकडे त्यांच्या बाटलीमधलं पाणी मागितलं तर मात्र भूत बघितल्यासारखे आपल्याकडे बघतात, हे सगळं मुंबईत वाढलेल्या मला थोडं विचित्र वाटलं होतं. त्यातून पब्लिक ट्रान्स्पोर्टशन सगळ्यात unsafe, हे कळल्यावर तर मला आपण कुठल्यातरी परग्रहावर आलोय असंच वाटायला लागलं होतं. त्या वेळी, पहिल्या भारत फेरीमध्ये मी पहिल्या दिवशी (आरामचा वडा पाव घेऊन) लोकल ट्रेन मध्ये CST to Thane प्रवास करून आले होते. माझ्यासाठी मेडिटेशन होतं ते.
मग हळू हळू आणखी काही गोष्टी कळायला लागल्या. इथे डाव्या नाही, उजव्या बाजूने गाडी चालवतात; तापमान Celsius मधे नाही, Fahrenheit मध्ये मोजतात; वजन किलो मध्ये नाही पौंड्स मध्ये मोजतात; अंतर किलोमीटर्स मध्ये नाही miles मधे मोजतात; त्यामुळे उंचीसुद्धा नेहमीसारखी फुटांमध्ये मोजत नसतीलच असा समज करून घेऊन मी आमच्या मेडिकल check-up मध्ये स्वतःची उंची सेन्टिमेटर्स मध्ये सांगितली होती. असो. त्यात 'आपल्याकडे' (म्हणजे भारतात) मिळतं त्यापेक्षा कित्ती मोट्ठ्या आहेत सगळ्या गोष्टी असंही वाटलं होतं. पहिल्यांदा इथल्या ग्रोसरी स्टोरमध्ये गेले, आणि घरी आल्या आल्या आईला फोन करून "इथला एक कांदा आपल्या तीन कांद्यांएवढा आहे" हे सांगितलं. इथल्या बसेस मध्ये गर्दीच नसते, पण त्या वेळेवर येतात; रस्त्यावर चालणारी माणसं दिसतंच नाहीत; इथल्या गाद्या विचित्र स्प्रिंगच्या असतात, त्यावर पाठ दुखायला लागते; इथलं पाणी मचूळ आहे, त्याला काही चव नाही; इथलं दूध विचित्र आहे, त्याचा चहाच चांगला होत नाही; इथली हवा कोरडीच आहे, त्वचा सगळी फुटते; अगदी इथले कागदसुद्धा वाईट्ट आहेत, पेपर कट्स होतात.... एक ना दोन, नुसत्या तक्रारीच होत्या मला. आपल्या मुंबईपेक्षा इथे सगळंच कसं वेगळं... आणि खरं म्हणजे वाईट आहे, अशी एक ठाम समजूत झाली होती माझी.
वर्ष-दीड वर्षं झालं, तरीही माझे इथल्या कोणाशीच बंध काही जुळलेच नाहीत. मग एके दिवशी रेसिडेन्सी मध्ये सकाळच्या पहिल्याच meeting मध्ये जेन Trader Joe's मधून Sugar Snap peas, cherry tomatoes, cut apples आणि hummus असं सगळं घेऊन आली. मीटिंग मध्ये बसल्या बसल्या सगळ्यांबरोबर एकत्र खात खात चर्चा चालू होती, पण का कोण जाणे, त्या दिवशी मला पहिल्यांदा मी 'त्यांचा' भाग झालीय, असं वाटलं. मग हळू हळू खाणं share करणं रोजचा भाग झालं... खाण्याबरोबर गप्पा व्हायला लागल्या... मग cultural देवाणघेवाण व्हायला लागली. तंदूरी चिकन आणि पनीर टिक्का मसाला व्यतिरिक्त अजूनही काही Indian cuisine असतं, ह्याची नव्याने होऊ घातलेल्या मैत्रिणींना ओळख करून देण्यासाठी मी सगळ्यात आधी पोहे, मग काकडीची कोशिंबीर आणि मग एके दिवशी चक्क कुळिथाचं पिठलं खाऊ घातलं... "It's got just the right amount of spice!" अशी प्रतिक्रिया मिळाल्यावर मला नुसती मोहरी-हिंग-हळद हे सुद्धा मसाले किती महत्त्वाचे असतात ह्याची नव्याने जाणीव झाली. मग माझ्या मैत्रिणींनी सुद्धा मला पेरुव्हिअन जेवणाची ओळख करून दिली; घरगुती नोपालेसची  भाजी, फिलिपिनो डेझर्टस, पोर्तोसच्या पेस्ट्रीज खाऊन मलासुद्धा नवनवीन चावी कळल्या. पेरुव्हिअन जेवणापासून सुरु झालेला हा सिलसिला मग इतरही बाबतीत चालूच राहिला.
माझ्याही नकळत माझ्या स्वतःबद्दलच्या जाणीवा बदलत होत्या. छोले आणि पुलाव मध्येच खाल्ली जाणारी दालचिनी आता चहात सुद्धा आवडायला लागली. अवोकाडो, ब्लू बेरीज आवडत्या फळांमध्ये यायला लागले. लाल माठाच्या भाजीच्या रेसिपीचा प्रयोग चार्ड वापरून व्हायला लागला. हॅलोवीनला भोपळा आधी कार्व्ह होऊन मग घारगे बनायला लागले. गणपती-दिवाळीबरोबरच थॅंक्सगिविंग सुद्धा लक्षात राहायला लागला. कोपरात शिंकून मग "Excuse me!" म्हणणं, येत-जाता प्रत्येकाला "haaaiii... how are you?" वगैरे म्हणून.. "Hug" करणं, Cute videos बघून "Awwww..." वगैरे प्रतिक्रियासुद्धा आता रोजच्या झाल्या. भारतात गेल्यावर धुळीचा त्रास व्हायला लागला, आणि २६ डिग्री सेल्सिअस पेक्षा ७८ डिग्री फॅरेनहाईट म्हणजे किती गरम हे कळायला लागलं.
"आता काय, तू अमेरिकन झालियस..." असं कोणी म्हंटल्यावर मात्र जाम राग यायचा. मग लक्षात आलं... इथल्या गोष्टी मला आवडायला, कळायला, आपल्या वाटायला लागल्या होत्या, पण म्हणून तिथल्या आठवणी कमी झाल्या नव्हत्या किंवा तिथल्या गोष्टी नावडत्या झाल्या नव्हत्या. स्वतंत्र रित्या बरीच वर्षं एका ठिकाणी राहिल्यावर जशी सवय होते... तसंही झालं होतं कदाचित.... दहावीपर्यंत एकही अमराठी मैत्रिण नसलेली मी... इथे आल्यावर बऱ्याच इतर भाषांशी, संस्कृतींशी ओळख झाली... आई-बाबांच्या कुटुंबाचा भाग असणाऱ्या माझं एक स्वतंत्र कुटुंब इथे निर्माण झालं... मी केलं.. होमसिकनेस हळू हळू कमी झाला... केला... भारतीय जाणिवांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जगणारी माणसं असतात, आणि ती सुद्धा खूप interesting असतात... चूक किंवा बरोबर नसतात हे कळलं... विरहामुळे व्यक्तीचं महत्त्व कळतं... तसं परदेशामुळे भारतातल्या सगळ्यांचीच किंमत कळली.. दृष्टिकोन बदलले, विचारकक्षा रुंदावल्या.
लहानपणी चष्मा लागला ना, कि डॉक्टर सांगतात, जोपर्यंत उंची वाढत राहील, तोवर चश्म्याचा नंबर वाढत राहील, आणि चष्मा बदलत राहावं लागेल... मला वाटतं, आयुष्याच्या प्रत्त्येक टप्प्यात आपली अनुभवांची उंची अशीच वाढत जाते आणि आपला दृष्टिकोन, Perceptions बदलत जातात. सगळ्यांच्याच आयुष्यात हे होतंच... पण बहुधा परदेशी जाऊन राहणाऱ्यांना हा अनुभव growth spurt सारखा येतो. तो सांभाळायचा कसा, हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. असो.
माझ्या बाबतीत, माझ्या डोक्यातले "स्टँडर्ड्स" चे नॉर्म्स बदलले हे मात्र खरंय. स्वतःच्या आणि खाण्याच्या ""size" चे स्टॅंडर्ड अमेरिकन झालंच आहे; आजकाल "आपल्याकडे" हा शब्दसुद्धा इंडियन आणि अमेरिकन गोष्टींना आलटून पालटून वापरला जाऊ लागला आहे. परवा "चॉकलेटचा बंगला" हे गाणं म्हणून दाखवताना माझी मुलगी "शेपटीच्या झुपक्याने झाडून जाईल खार" या ओळीला तिची चारचाकी खेळण्यातली 'कार" घेऊन आली.... तेव्हाच आता शब्दोच्चारांचे स्टँडर्ड्स सुद्धा बदलायला हवेत याची जाणीव झाली... चष्मा बदलायची वेळ आलीच पुन्हा...

- समृद्धी

6 comments:

  1. परिसराच्या बदलांशी आपण कसे जुळवून घेतो याची ही एक सुंदर मांडणी...

    ReplyDelete
  2. The post was written for a dear friend Amruta Hardikar's initiative "pandharawada" as a guest writer. Amruta writes around 15 posts... a post every day from December 15-year end. Please check out her blog http://amrutahardikar.blogspot.com/

    ReplyDelete
  3. प्रवाही आहे तुझं लेखन!आवडलं.

    ReplyDelete
  4. Sundar lihila aahes.
    Pahilyandach vishay suddha barach wegla !

    ReplyDelete