Wednesday, May 12, 2010

माझी वही : ४. शिंपले वेचताना.....


किना-यावरुन चालतेय... समुद्राच्या... शिंपले वेचतेय... मोत्यांच्या शोधात... बरेच शिंपले आहेत... नाना रंगाचे, आकाराचे... काही छोटे... काही मोठे... दुरून सारे सारखेच... पण थोडं जवळ गेलं की त्यातलं वैचित्र्य...  विविधता समजणारी...

खरं सांगायचं तर प्रेमात आहे मी शिंपल्यांच्या... अर्थात् त्यांना हे कसं कळणार म्हणा... एक एक करत सगळेच शिंपले पारखतेय... काही सुबक... काही खडबडीत... काही बोचले... काही उघडायचा प्रयत्न करुनही उघडले नाहीत...काही उघडले.. पण मोती नाही मिळाला... स्वातीच्या थेंबांनी त्याला भिजवलं नाही यात त्या शिंपल्याची काय चूक....!

किना-यावर चालता चालता पाय एका शिंपल्याशी अडखळले... जणू तो मला थांबवत होता... हातात घेतलं त्याला... कुरवाळलं...आणि तो सहज उघडला देखील... आतमध्ये मोतिया रंगाचं हास्य फुलत होतं... मला एक मोती मिळाला... खूप खुलले मी...मग त्याच्यासारखेच शिंपले शोधायला लागले... शिंपले सापडले... पण मोती नाही...

........ मिळालेला मोती खूप जपून ठेवलाय मी... एका सुंदर कुपीत...

किनारा बराच लांब आहे...शिंपले तर लाटेगणिक वाढताहेत... आता चालून पाय दुखण्याआधी.... निदान एक कुडी बनवण्याइतके मोती मला मिळतील?.... मिळतील.... ना..?!

( मार्च २००८)

- Samruddhi

Monday, May 10, 2010

माझी वही : ३. परडी

काही फुलं सदाफुलीची,
सोज्वळ, नेहमी फुललेली.
पण तरीही...
सुवासाच्या अभावामुळे दुर्लक्षित होणारी.

काही फुलं बकुळीची,
नाजुक, पट्कन् सुकणारी.
पण तरीही...
सुगंधाने दशदिशा दरवळून टाकणारी.

काही फुलं गुलाबाची,
बहुरंगी, रुपगंधानं मुसमुसलेली.
पण तरीही...
जवळ काटे बाळगुन असणारी.

काही फुलं कमळाची,
भरदार, सर्वांगी सम्रुद्ध असणारी.
पण तरीही...
चिखलातच पाय अडकलेली.

अशा काही फुलांची ही एक परडी,
न्याहाळते आहे मी,
आणि शोधते आहे,
माझं फूल!

( डिसेंबर १९९९)

- Samruddhi

Friday, May 7, 2010

Thought

Perceptions are not of things but of relationships.
Nothing, including me, exists by itself - this is an illusion of words.

I am a relationship, ever-expanding.

- Hugh Prather
(Notes to Myself)

Thursday, May 6, 2010

माझी वही : २. कविता...

खोटं कधी बोलू नये
खरं कुणाला सांगू नये
बुद्धीबळाच्या पटावर
शब्दकोडी सोडवू नये

कुणाकडे काही मागू नये
मागितल्याशिवाय देऊही नये
केलेच कुणावर उपकार तर
व्याजाची अपेक्षा करू नये

डोकं रिकामं ठेवू नये
विचारात गुंगून जाऊ नये
नाहीच उत्तरं मिळाली तर
नुसतंच रडत बसू नये

डाराडूर झोपू नये
सतत सावधही असू नये
स्वप्नपूर्ती होण्याची
अपेक्षा मात्र बाळगू नये

हाव कधी धरू नये
विरक्तही होवू नये
फुलपाखरं पकडण्याचा
अट्टाहास करू नये

बनवाबनवी करू नये
साधंसरळही असू नये
वळणावळणांच्या रस्त्यावर
वाटाड्यावर पूर्ण विसंबू नये

दिमाखदार दिसू नये
अजागळही असू नये
बहुरंगी या जगात
पण मेकअप् शिवाय फिरू नये

कौतुकात रमू नये
द्वेषात मोडून पडू नये
स्टेजवरच्या नाटकातला
रोल स्वत: जगू नये

निगरगट्ट राहू नये
भावनाविवश होवू नये
मनामधल्या अंतरांसाठी
मोजपट्टी शोधू नये

( नोव्हेंबर २००४)

- Samruddhi

Wednesday, May 5, 2010

माझी वही : १. तो... आणि पाऊस


तो...
त्याचा गंध... त्याची आस
हरवते माझी मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
ऊनसरींचा खेळ करतं
हा पाऊस... वळवाचा

तो...
त्याचा स्पर्श... त्याची गाज
विसरते माझी मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
धो धो कोसळू लागतं
हा पाऊस... वादळाचा

तो...
त्याची चाहूल... पडलेली भूल
फसवते माझी मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
संयम सुटून रडू लागतं
हा पाऊस... गारांचा

तो...
त्याचा श्वास... किरर्र आभास
भुलवतात माझे मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
अंधाराचा कडेलोट करतं
हा पाऊस... अस्तित्वाचा

एवढ्यात कुठेतरी किरण येतात,
इंद्रधनुष्याचे रंग भरतात,
मोहरुन टाकतात माझे मलाच!
आताही आभाळ दाटून येतं,
सोबत जीवन घेऊन येतं,
हा पाऊस... हर्षाचा...
हा पाऊस... जल्लोषाचा!!!

( एप्रिल २००४)

- Samruddhi

माझी वही....


काल कपाट आवरलं.... आणि एका कोप-यात माझी थोडी खिळखिळी झालेली वही सापडली... काही वर्षांपूर्वी मीच लिहिलेला ऐवज मिळाला... आणि मग blog खुणावू लागला...

मजा असते नाही... आपण कधी, काय, कशाला लिहितो... याचे संदर्भ नंतर आठवावे लागतात... आणि आपल्यालाच आपण नव्याने उमगू लागतो...

म्हणूनच आता वही blog वर आणतेय... त्या काळासहित...

माझी वही....

- Samruddhi