Thursday, May 6, 2010

माझी वही : २. कविता...

खोटं कधी बोलू नये
खरं कुणाला सांगू नये
बुद्धीबळाच्या पटावर
शब्दकोडी सोडवू नये

कुणाकडे काही मागू नये
मागितल्याशिवाय देऊही नये
केलेच कुणावर उपकार तर
व्याजाची अपेक्षा करू नये

डोकं रिकामं ठेवू नये
विचारात गुंगून जाऊ नये
नाहीच उत्तरं मिळाली तर
नुसतंच रडत बसू नये

डाराडूर झोपू नये
सतत सावधही असू नये
स्वप्नपूर्ती होण्याची
अपेक्षा मात्र बाळगू नये

हाव कधी धरू नये
विरक्तही होवू नये
फुलपाखरं पकडण्याचा
अट्टाहास करू नये

बनवाबनवी करू नये
साधंसरळही असू नये
वळणावळणांच्या रस्त्यावर
वाटाड्यावर पूर्ण विसंबू नये

दिमाखदार दिसू नये
अजागळही असू नये
बहुरंगी या जगात
पण मेकअप् शिवाय फिरू नये

कौतुकात रमू नये
द्वेषात मोडून पडू नये
स्टेजवरच्या नाटकातला
रोल स्वत: जगू नये

निगरगट्ट राहू नये
भावनाविवश होवू नये
मनामधल्या अंतरांसाठी
मोजपट्टी शोधू नये

( नोव्हेंबर २००४)

- Samruddhi

2 comments:

  1. समृद्धी: भारीच!
    तुझ्याबाबतीत आमच्यासारख्याची भावना फक्त याच शब्दांत व्यक्त करता येईल

    सुर्याला पाठ दाखवत जगू नये
    पण आकाशाला ओंजळीने मापूही नये
    हातात आलाच जरी एखादा कवडसा
    प्रकाशाशी नातं सांगू नये

    ReplyDelete
  2. kavitepeksha comment sunder asnyachi rarest wel... saadhlis..

    ReplyDelete