Wednesday, May 5, 2010
माझी वही : १. तो... आणि पाऊस
तो...
त्याचा गंध... त्याची आस
हरवते माझी मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
ऊनसरींचा खेळ करतं
हा पाऊस... वळवाचा
तो...
त्याचा स्पर्श... त्याची गाज
विसरते माझी मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
धो धो कोसळू लागतं
हा पाऊस... वादळाचा
तो...
त्याची चाहूल... पडलेली भूल
फसवते माझी मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
संयम सुटून रडू लागतं
हा पाऊस... गारांचा
तो...
त्याचा श्वास... किरर्र आभास
भुलवतात माझे मलाच!
एवढ्यात आभाळ दाटून येतं,
अंधाराचा कडेलोट करतं
हा पाऊस... अस्तित्वाचा
एवढ्यात कुठेतरी किरण येतात,
इंद्रधनुष्याचे रंग भरतात,
मोहरुन टाकतात माझे मलाच!
आताही आभाळ दाटून येतं,
सोबत जीवन घेऊन येतं,
हा पाऊस... हर्षाचा...
हा पाऊस... जल्लोषाचा!!!
( एप्रिल २००४)
- Samruddhi
Subscribe to:
Post Comments (Atom)
छान, काळाबरोबर अधिकाधिक गर्भित होणारी कविता आहे असे मला वाटते.
ReplyDelete