Sunday, June 28, 2020

बालगोष्ट १: ग्रहांची सहल

एकदा काय झालं, सूर्याने (Sun) ठरवलं की सगळ्या ग्रहांची (Planets) सहल न्यायची. मग सूर्याने सगळ्या ग्रहांना त्यांच्या बॅग्स, डबे आणि पाण्याच्या बॉटल्स घेऊन यायला सांगितलं. सगळे ग्रह सांगितलेल्या वेळेला सूर्याकडे येऊन हजर झाले. सूर्य आणि सगळे ग्रह तिथून बसमधून एका पार्कमध्ये गेले. तिथे सगळे मिळून खूपखूप खेळले, खूप दंगा केला आणि मग दमले. सूर्यदादा म्हणाला,” चला चला आता जेवायची वेळ झाली. सगळ्यांनी स्वच्छ हात धुवून घ्या, आणि डबे काढा. आज मी बघणार आहे कोण कसं जेवतय ते. आणि सगळ्यात छान जेवणाऱ्या ग्रहाला माझ्याकडून एक छानसं बक्षीस!”

बक्षीस ऐकताच ग्रहांनी डबे काढण्याची घाई केली. बुध (Mercury) आणि शुक्र (Venus) दोघांना लागली होती खूप खूप भूक. त्यांनी हात न धुताच डबा काढला. बुधच्या डब्यात होता चिवडा आणि शुक्राच्या डब्यात होते लाडू. दोघांनी इतरांसाठी न थांबता गपागप चिवडालाडू फस्त करून टाकले. सूर्यदादा हे बघत होता. 

पृथ्वी (Earth), मंगळ (Mars), गुरु (Jupiter) आणि शनी (Saturn) सगळे हात धुवून आले आणि त्यांनी आपापले डबे काढले. पृथ्वीने डब्यात आणली होती पोळी आणि भाजी, मंगळाने आणला होता ब्रेड आणि जॅम, गुरूने आणला होता पिझ्झा आणि शनीने आणला होता पुलाव. मंगळाला जॅम खूपच आवडायचा म्हणून त्याने सगळं जॅम आधी चाटून खाऊन टाकला, आणि उरलेला ब्रेड तसाच पुन्हा डब्यात ठेवून दिला. गुरूला पिझ्झावरचं चीज खूपच आवडायचं, म्हणून गुरूने ते काढून खाऊन टाकलं, आणि उरलेला पिझ्झा तसाच ठेवून दिला. सूर्यदादा हेही बघत होता.

पृथ्वी आणि शनी मात्र त्यांचे डबे शांतपणे खात होते. दोघांनी आपापले डबे संपवले आणि पुन्हा बॅगमध्ये भरून ठेवले. शनीने आपले हात पटकन पॅन्टला पुसले आणि तो पाणी प्यायला लागला. पृथ्वीने डबा ठेवला, आणि ती पार्कमधल्या सिंकपाशी जाऊन पटकन हात धुवून, बरोबरच्या रुमालाला पुसून जागेवर येऊन बसली. सूर्यदादा हेसुद्धा बघत होता.

युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) डबा घेऊनच नव्हते आले. त्यांना पार्कमधलं आईस्क्रीम खूपच आवडायचं. त्यांनी जेवणाची वेळ होताच चक्क पळ काढला आणि मस्तपैकी जाऊन दोनदोनदा आईस्क्रीम खाऊन घेतलं. सूर्यदादांचं इथेसुद्धा लक्ष होतं.

सगळ्यांचं खाऊन झालेलं बघताच सूर्यदादाने बोलायला सुरुवात केली. “ मी जेवायची वेळ झाली हे सांगितल्यापासून आत्तापर्यंत माझं सगळ्यांकडे पूर्ण लक्ष होतं. अगदी जे इथे न थांबता गुपचूप आईस्क्रीम खाऊन आले त्यांच्याकडे सुद्धा.”
युरेनस आणि नेपच्यून वरमले. सूर्यदादा पुढे बोलायला लागला.

“ आज सगळ्यात छान जे दोघे जेवले आहेत ते म्हणजे पृथ्वी आणि शनी. त्यांनी स्वतःचे डबे आणले, जेवण्यापूर्वी हात धुतले, डब्यात दिलेलं सगळं.. अगदी सगळ्या भाज्यांसकट संपवलं. फक्त जेवणानंतर हात धुवायला शनी विसरला आणि त्याने हात कपड्यांनाच पुसून टाकले. पृथ्वीने मात्र तिची भाजीपोळी छान खाल्ली, बाहेर सांडलं नाही आणि नंतर हातही धुतले. म्हणूनच… म्हणूनच आजचं बक्षीस मिळणार आहे.. पृथ्वीला.”

सूर्यदादाने पृथ्वीला जवळ बोलावलं आणि तिच्या हातात सप्तरंगी इंद्रधनुष्य (Rainbow) दिलं. “आजपासून जो चांगलं जेवेल आणि जेवणापूर्वी आणि नंतर नीट हात स्वच्छ करेल, त्यालाच हे इंद्रधनुष्य दिसेल.” असं सांगून सूर्यदादा सगळ्या ग्रहांना घेऊन पुन्हा आपल्या घरी गेला.

तुम्ही घरी छान जेवता का? आणि पृथ्वीने केलं तसे हातही स्वच्छ करता का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे… तुम्हाला इंद्रधनुष्य दिसलंय का?

-समृद्धी