Saturday, January 30, 2021

We'll look good together!

 १. 

आज खरं तर त्याला शाळेत जायचंच नव्हतं. गेले दहा दिवस जवळजवळ रोज सगळे 'ढापण्या' म्हणून चिडवत होते. त्यांच्या वर्गात तो एकटाच चष्मीश झाला होता, आणि त्यामुळे मुलांना खेळण्याचं आणि चेष्टेचं एक नवीन साधन मिळालं होतं. म्हणजे तसं म्हणायला कोणी त्याला अगदीच त्रास देत नव्हतं... पण 'ढापण्या' उपाधीपासून त्याची सुटका होण्याची सुद्धा चिन्ह दिसत नव्हती. 

शाळेची घंटा झाली आणि सगळे जागेवर जाऊन बसले. शिक्षिका वर्गात आल्या. त्यांच्या मागोमाग आणखी एक मुलगी आत आली. टप्पोरे डोळे, डोक्यावर हेअरबँड, पॉपीचं चित्र असलेली बॅग आणि नवा कोरा युनिफॉर्म घालून आलेली ती अगदी बाहुलीसारखी होती. सगळ्या मुलांमध्ये उत्सुकतेने कुजबुज सुरु झाली. बाईंनी सगळ्यांना तिची ओळख करून दिली, उंचीनुसार तिला मधल्या रांगेत तिसऱ्या बाकावर बसायला जागा नेमून दिली. त्याच्या चष्म्याच्या कोपऱ्यातून तो हे सगळं बघत होता. 

हजेरी पूर्ण झाल्यावर बाईंनी सगळ्यांना त्यांच्या वह्या काढायला सांगितल्या. तिनेसुद्धा आपल्या बॅगमधून छान कव्हर घातलेली वही काढली, कंपासपेटी काढली... आणि मग आणखी एक कंपासपेटी बाहेर काढली. तिच्या शेजारी बसलेल्या निकिताने कुतूहलाने बघितलं तर काय... तिने पेटी उघडून एक छोटासा चष्मा डोळ्यावर चढवला होता. न राहवून निकिता गालातल्या गालात हसायला लागली. मधली सुट्टी होईपर्यंत सगळ्या वर्गाने वळुनवळून तिच्याकडे बघून घेतलं... घंटा झाली आणि ती कावरंबावरं होऊन चक्क बाकावर तोंड लपवून रडायलाच लागली. 

सगळी मुलं आपल्या गप्पांमध्ये मश्गुल होती. तेवढ्यात तिच्या मांडीवर कोणीतरी एक छोटीशी पेटी सरकवली. तिच्या चष्म्याच्या पेटीसारखीच होती अगदी... तिने उघडून पाहिली तो ती रिकामीच... डोकं वर काढून तिने त्या दिशेला पाहिलं... तो त्याच्या चष्म्याच्या काचांमधून तिच्याकडे बघून 'हाय' करत होता. डोळे पुसून तिने आपला चष्मा पुन्हा चढवला, आणि गोड हसून ती डबा घेऊन त्याच्यापाशी गेली.

तब्बल दहा दिवसांनंतर पहिल्यांदाच त्याच्या ढापणांना जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. 


२. 

"सारखा सारखा चष्मा कसा कुठेतरी विसरतोस रे?! इतकी वर्षं झाली... थोडातरी व्यवस्थितपणा नको का..." वैतागून आई बाबांना बोलायची. तिच्या आवरावरीमध्ये बाबांचं "छ्या... हा चष्मा कुठे दिसत नाही बघ... अगं जरा बघतेस का.... मला काही सुचत नाहीये..." वगैरे सुरु झालं.. की आईला जाम राग यायचा. आणि बाबांना अगदी त्यांच्यापासून हातभर लांबीवर असणारा चष्मासुद्धा सापडायचा नाही. त्यात खरंतर दृष्टीपेक्षा वेन्धळेपणाचाच भाग जास्त होता. पण त्यामुळे आईची आणखी चिडचिड व्हायची. बाबांचा चष्मा हा आईच्या डोक्याचा एक ताप झाला होता. 

आज मात्र गोष्ट थोडी वेगळी होती. आज आईला चष्मा लागलाय हे कळलं होतं. चष्म्याची फ्रेम विकत घेताना आईने केलेल्या गोंधळाच्या वेळी बाबांना मनापासून हसू आलं होतं. नवीन दागिन्याची काळजी कशी घ्यायची हे आईला कळल्यावर तर..."अरे तू थोडी तरी काळजी घेत जा तुझ्यासुद्धा चष्म्याची..." हे बाबांना पुन्हा ऐकायला लागलं होतं. 

आईचा चष्मा घेऊन दोघे घरी आले, आणि दोन्ही चष्म्याची कव्हर्स टीव्ही जवळच्या टेबलावर स्थानापन्न झाली. हातपाय धुवून झाल्यावर चहा करून बाहेर आई घेऊन आली.. तोवर बाबांनी लॅपटॉपवर काम सुरु केलं होतं. आई पेपरची पुरवणी वाचायला घ्यायची म्हणून चष्मा घालायला गेली तर चष्म्याचं कव्हर रिकामंच. आता मात्र आई कावरीबावरी झाली. रोज बाबांना केलेल्या कटकटीची तिच्या मनात उजळणी झाली. आपणसुद्धा त्यातलेच कि काय... वगैरे मनात विचार यायला लागले... 

"काय शोधतेयस गं?" ज्या प्रश्नांची भीती होती, तो बाबांचा प्रश्न आलाच... "अरे माझा चष्मा..." असं म्हणून आई वळली.. आणि स्वतःचा चष्मा खिशात आणि तिचा चष्मा स्वतःच्या डोळ्यावर चढवून काम करत बसलेले बाबा खो-खो हसत सुटले. 

आजकाल आईबाबांमध्ये चष्मा हरवण्यावरून वाद होत नाहीत. टेबलावर असलेली दोन्ही कव्हर्स त्यांच्या सहजीवनाचा आनंद पुरेपूर लुटत असतात. 


३. 

"काय गं, एवढी मोठ्ठी फॅमिली आहे का गं दादूष्काची?"

"कोण? ओह.. निकोलाई... हो. आज त्यांची नव्वदी साजरी करायला आलेत. त्यांच्या दोन्ही मुली, जावई, ३-४ नातवंडं..."

"मुली कोण गं?"

"ती रेड हेडेड आहे ना, ती मोठी मुलगी, आणि ती टोपी घातलेली आहे बसलेली, पाठमोरी, ती धाकटी."

"ए दादूष्का रेड हेडेड होते का ग तरुणपणी? कारण तानिश्का तर blonde केसांची आहे."

"हं?"

"ए ती मोठ्या मुलीबरोबर आहे ती कोण गं?"

"आई आहे ती त्यांची. निकोलाई दादूष्काची बायको."

"म्हणजे? अगं... मग तानिश्का? अगं मी इतके दिवस समजत होते, तातियाना आणि निकोलाई are married... ते नेहमी एकत्रच तर असतात ना... आणि आत्तासुद्धा... Oh my god! म्हणजे?"

"अगं... ताती आजी २ वर्षांनी मोठी आहे. निकोलाई जेव्हा इथे आले, तेव्हा ताती आजीला येऊन एक वर्ष होऊन गेलं होतं. तिचा विसराळूपणा वाढत चालला असला तरी ती तशी independent होती. निकोलाईचा dementia मात्र बराच advanced होता. बऱ्यापैकी dependent, wheelchair-bound होते. सोशल सर्कल च्या वेळी एके दिवशी एकमेकांना भेटले दोघे. बिंगो खेळताना शेजारी बसले होते. निकोलाई चष्मा विसरला.. तातिने स्वतःचा दिला. नक्की निकोलाईच्या मनात काय झालं माहिती नाही, पण त्या दिवसापासून दोघे एकमेकांशी नवरा-बायको समजून बोलतात. तातिच्या नवऱ्याला जाऊन बरीच वर्षं झालीयत. दोन्ही मुलं अधूनमधून भेटायला येतात. पण ताती निकोलाई बरोबर असल्याशिवाय कोणाला भेटायचं नाही असंच म्हणते."

"पण मग दादूष्काची बायको? त्या कसं काय चालवून घेतात? आणि फॅमिली?"

"निकोलाई सुद्धा तातीला सोडून जात नाही. स्वतःची, जगाची, काळाची ओळख विसरत चाललेल्या माणसाबरोबर राहणं खूप कठीण असतं अगं.  आम्ही जेव्हा ह्या प्रकाराबद्दल पहिल्यांदा त्यांना सांगितलं, तेव्हा आजींना थोडा त्रास झाला. पण institutionalize करायला लागलेला आपला नवरा एकटा नाहीय हा दिलासाही त्यांना मिळाला. समजून घेतलंय त्यांनी. आज मला म्हणाल्या, Today I told Tatiyana, I am his old flame who is here to wish him birthday... she was so jealous... आणि खदखदून हसल्या."

"मजाच आहे ग सगळी... वेगळंच काहीतरी..."

"They do look good together..."


४.

नवा कोरा चष्मा त्याच्या नव्या कोऱ्या कव्हर मध्ये घरी येतो. जसे मोठे होत जातो, तशी उंची बदलत जाते, दृष्टी बदलत जाते, दृष्टिकोन बदलत जातात. चष्म्याचे नंबर बदलून घ्यायला लागतात. मग कधीतरी उंची वाढायची थांबते. पण आजूबाजूचं जग बदलत जातं. नंबर तोच राहतो, फ्रेम्स बदलून आपण बदलत्या जगाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत राहतो. मग कधीतरी अचानक डोळ्यांचा चष्मा त्याच्या कव्हर मध्ये कायमचा बंदिस्त होतो आणि गोष्ट पूर्ण होते. 


- समृद्धी